उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून मुंबई येथून आलेल्या 30 महिला पथकांची शोभा यात्रा 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.

अमृत महोत्सवी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून ते यशस्वी करण्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अर्चना पाटील,युवा नेते मल्हार पाटील यांनी कंबर कसली असून रोज नियोजन आढावा बैठक घेत घरोघरी जाऊन जनजागृती व रॅली काढली जात आहे. जिल्ह्यातील वाडी, वस्ती, तांडे, गावे या प्रत्येक कोपऱ्यात टीम पोहचत असून सहभागी होत आहेत.

अर्चना पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांची बुलेट रॅली, मैदानी खेळासह विविध कार्यक्रम 15 ऑगस्ट रोजी होणार असून सकाळी 9 वाजता ही सर्व पथके लेडीज क्लब येथे एकत्र होणार आहेत. तिथून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून शहरात ही पथके प्रात्यक्षिक साजरी करतील.

बुलेट, कायनेटीकवर महिलांची, युवतीची मराठमोळ्या पोषशात सहभागी होऊन दिमाखदार रॅली होणार आहे, मुंबई येथील पथक देशभक्तीपर गाण्यावर सर्व मैदानी खेळ, तलवार,दांडपट्टा, ढोल, ताशा, लेझीम, झाज, झेंड्याचे रिंगण आदी खेळ करीत शोभा यात्रेत सहभागी होणार आहेत.

देशभक्तीपर गाणी,घोडे, उंट, कर्तृत्वान महिलांच्या वेशभूषातील महिला तसेच अन्य महिला युवती हातात तिरंगा घेऊन सहभागी होत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करणार आहेत. राष्ट्रध्वज म्हणजे आपली अस्मिता, आपला अभिमान, हा अभिमान आपल्या घरावर तिरंगा फडकावून आणि शोभा यात्रेत तिरंगा उंचावून व्यक्त करायचा आहे. चला तर मग आपण सर्व महिला पारंपरिक वेशभूषात तिरंगा फडकवत स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील होउया असे आवाहन अध्यक्षा अर्चना पाटील यांनी केले आहे.

 
Top