उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ सदस्यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविकास आघाडी सरकारकडे औरंगाबाद चे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याची आग्रही मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांनी तेव्हा निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री मागच्या महिन्यात संभाजीनगर ला सभेनिमित्त आले असता तेथे तरी याची घोषणा करतील अशी जनभावना होती, मात्र त्यांनी घोर निराशा केली.

आता मात्र ना. एकनाथजी शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे यांना जाग आली, व आज निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्यावर आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद चे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. याला उशिराने सुचलेले हे शहाणपण म्हणावे लागेल. या निर्णयाचे पूर्ण श्रेय ना. एकनाथजी शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला जाते.

आजच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व धाराशिव व संभाजीनगर ही अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाल्याने सर्वांना शुभेच्छा देतो. मंत्रिमंडळाला उशीराने का होईना पण सुचलेल्या या शहाणपणा बद्दल देखील धन्यवाद देतो.

 
Top