उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर संजीवनी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर पाणी साचण्याच्या प्रकारामुळे नागरिकांची अडचण निर्माण झाल्यासंदर्भात नगर परिषद प्रशासनामार्फत यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला असून भारतीय दूरसंचार निगम कार्यालयाला तोंडी सूचना देखील दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले असून लवकरच या त्रासातून मुक्तता होईल अशी माहिती नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर संजीवनी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचत आहे. या रस्त्याचे आणि नालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे. नालीचा आकार छोटा असल्यामुळे आणि त्यालगत भारतीय दूरसंचार निगम कार्यालयाच्या दूरध्वनीच्या वायरचे जाळे असल्यामुळे ही समस्या उद्भवलेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. शनिवारी पावसामुळे या रस्त्यावर पाणी साचले होते. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर नगर परिषद कार्यालयामार्फत 9 कर्मचारी, 1 स्वच्छता निरीक्षक यांच्या पथकाने एका जेसीबीच्या साह्याने पाण्याला वाट मोकळी करुन दिलेली आहे. 

आगामी काळात असा प्रकार उद्भवू नये याकरिता या रस्त्यालगत असलेल्या नालीचा आकार मोठा करणेबाबत आणि रस्त्यालगतच असलेल्या भारतीय दूरसंचार निगमच्या वायरचे जाळे इतरत्र हलविण्याबाबत नगर परिषद प्रशासनामार्फत पाठपुरावा केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे याबाबत सकारात्मक असून लवकरच नालीचा आकार मोठा केल्यानंतर या रस्त्यावर पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी उस्मानाबाद नगर परिषद दक्षता घेत आहे, असेही नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी कळविले आहे.

 
Top