उस्मानाबाद / प्रतिनिधी-
फक्त नावापुरते , इव्हेंट पुरते वृक्षारोपण नको. आपण सगळे मिळून ही पृथ्वी वाचवू. ही तापमानवाढ रोखू. यासाठी उस्मानाबाद येथील समाज कल्याण विभाग , सह्याद्री देवराई आणि वृक्ष चळवळ यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे . त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष चळवळ उभारली जाणार आहेत त्याच बरोबर वृक्ष बँक आणि बी बँक हा नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याणच्या सर्व शाळा, वस्तीगृह ,दिव्यांग शाळांमध्ये बी बँक आणि वृक्ष बँकेची स्थापना आज करण्यात आली. राज्यातील असा हा पहिलाच प्रयोग आहे. आता यापुढे झाडे विकत आणाण्याची गरज पडणार नाही, त्यासाठी प्रत्येक शाळेने स्वतःची बी बँक आणि वृक्ष बँक उभी करुन या माध्यमातून प्रत्येक शाळा, वस्तीगृहामध्ये येणाऱ्या वर्षभरात किमान पाचशे ते हजार रोपं , झाडे तयार होतील. या माध्यमातून लाखो रोपे तयार होऊ शकतात.
आज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लातूर येथील विभागीय समाज कल्याण कार्यालयातर्फे आयोजित कार्यशाळेत बी आणि वृक्ष बँकेची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी झाडातील तरंगाबाबत आणि झाडातील उर्जेबाबत आपण जाणले पाहिजे. पृथ्वीवरील या ऊर्जेमुळेच आपले अस्तित्व आहे ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. शाळा, वस्तीगृह झाडांनी, पक्ष्यांनी भरलेले असावे. आपल्या भोवतालचे वातावरण प्रदूषणमुक्त राहावे, असे प्रत्येकाला वाटते पण यासाठी प्रत्येकांनी किमान तीन तरी झाडे लावावीत. आपण सर्वांनी हे महत्व ओळखून निसर्गाचे ऋण फेडूया ,असे आवाहनही त्यांनी केले .
सहाय्यक आयुक्त बाळासाहेब अरवत आणि जि.प. समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले ह्यांच्या प्रयत्नातून ही कार्यशाळा उस्मानाबाद येथे घेण्यात आली. पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि आपल्या प्रत्येक युनिटमध्ये ही वृक्ष चळवळ उभी राहावी यासाठीच आम्ही सर्व एकत्र जमलो असे मत त्यांनी व्यक्त केले.
पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून वृक्ष चळवळीच्या माध्यमातून मराठवाड्यात कार्य उभे करणारे व सह्याद्री देवराई वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप म्हणाले की, सह्याद्री देवराईचे मुख्य सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आपणाला प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत त्यांची स्वतःची त्यांची एक वृक्ष चळवळ निर्माण करावयाची आहे.
यापुढे झाडांसाठी कुणाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपण आपल्या प्रत्येक युनिटमध्ये स्वतःची बी बँक आणि वृक्ष बँक तयार करण्याचा संकल्प करु या. आपल्या शाळेमध्ये आपल्या परिसरामध्ये स्वतःच्याच बी बँकेतून आणि वृक्ष बँकेतून आपल्याला पाहिजे तेवढी झाडे उपलब्ध होतील. प्रत्येक ठिकाणी एक वृक्ष चळवळ निर्माण व्हावी , त्यांची स्वतःची बी बँक आणि वृक्ष बँक तयार व्हावी यासाठी आम्ही मराठवाडा दुर्मिळ वृक्षसंवर्धन समिती आणि सह्याद्री देवराईच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.येथील समाज कल्याण विभागाने बालाघाटाच्या या क्षेत्रात महाराष्ट्राला दिशादर्शक असे कार्य उभे करावे, असे आवाहनही श्री .जगताप यांनी यावेळी केले .
आपण पाहतो मुक्या प्राण्यांनी निसर्गाचे चक्र अबाधित राहण्यासाठी आपली जीवनशैली बदलली नाही, पण मानवाने मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळे विश्वच पादाक्रांत केले आणि निसर्गावर आक्रमण करीत आपली विकासाची भूक भागविणे चालू आहे. आपण मात्र आज हा विचार करीत नाही, की ज्या वसुंधरेने मला सर्व काही दिलं त्या वसुंधरेच्या रक्षणासाठी मी काय केलं?अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी दृढ निश्चय केला, त्याला प्रयत्नांची जोड दिली तर आपण हे चित्र निश्चितच बदलू शकू,असेही ते म्हणाले . डॉ बी आर पाटील यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी मागील तीन वर्षापासून लातूर जिल्ह्यात चाकुर तालुक्यात डोंगरावर जाऊन ४५ हजार झाडांची सह्याद्री देवराई पावसाच्या पाण्यावर कशी जगवली याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा शेवट सुपर्ण जगताप यांनी कवी, लेखक अरविंद जगताप यांची “झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे” ही निसर्गाविषयी प्रेरणा देणारी कविता सर्वांकडून म्हणवून घेतली. कार्यक्रमात संजय राठोड व सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन बावीचे मुख्याध्यापक जगताप यांनी केले.