उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून हवामान ढगाळ असून सूर्य दर्शनही झाले नाही. तथापि, जिल्ह्यात सरासरीच्या 199.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जुलैच्या गेल्या 12 दिवसांत 92.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संबंध जून महिन्यात 106.5 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. गेल्या 12 दिवसातील पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी 8.00 वाजपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात केवळ 3.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर काल दि.11 जुलै 2022 रोजी 1.5 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. 10 जुलै 2022 रोजी जिल्ह्यात 16.9 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. 09 जुलै 2022 रोजी मात्र 35.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. 8 जुलै 2022 रोजी जिल्ह्यात 6.1 मि.मी. पावसाची नोंद झाली तर 7 जुलै 2022 रोजी 2.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या 07 जुलै ते 12 जुलै 2022 या सहा दिवसांत 66.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर या सहा दिवसांत एकाही महसूल मंडळात किंवा तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही. त्यामुळे अद्याप धरणांच्या पाण्यात फार मोठी वाढ झाली नाही. तेंव्हा अद्याप जिल्ह्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. हवामान विभागाने येत्या 15 जुलै पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीसह दक्षतेचा इशारा दिली आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात जून 2022 मध्ये प्रत्यक्षात 106.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाची टक्केवारी 83.9 एवढी आहे. जून 2022 मध्ये प्रत्यक्षात जिल्ह्यातील तालुक्यांत पडलेला (मि.मी.मध्ये) पाऊस असा- उस्मानाबाद – 81.4, तुळजापूर – 133.1, परंडा – 65.2, भूम – 118.8, कळंब – 106.1, उमरगा – 108, लोहारा – 82.2 तर वाशी – 188.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. जूनमध्ये सर्वाधिक 188.3 मि.मी. पावसाची नोंद वाशी तालुक्यात झाली, सर्वात कमी पाऊस परंडा तालुक्यात 65.2 मि.मी. एवढा झाला आहे.
आजपर्यंत जिल्ह्यात तालुका निहाय प्रत्यक्षात पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये) असा- उस्मानाबाद – 162.5, तुळजापूर – 264.7, परंडा – 156.9, भूम – 190.5, कळंब – 180.7, उमरगा – 214.9, लोहारा – 175.7 आणि वाशी – 269.6 मि.मी. वाशी तालुक्यात सरासरीच्या सर्वाधिक प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची म्हणजे 269.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस परंडामध्ये 156.9 मि.मी.एवढा झाला आहे.