उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनचा  वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त फेडरेशनच्या वतीने ’श्रावण सरी’ हा कार्यक्रम घेण्यात आला.  

येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील स्व. प्रमोद महाजन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये प्रि-वेडिंग शूटिंग योग्य की अयोग्य ? या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्रात माजी प्राचार्या डॉ. अनार साळूंके यांच्यासह डॉ. सोनाली दिक्षीत आणि अपर्णा चौधरी यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. चर्चासत्रानंतर तेजस्विनी महिला मंडळाने मंगळागौरीच्या पारंपारीक खेळाचे सादरीकरण करुन संस्कृतीची जपणूक तसेच ’बेटी बचाव - बेटी पढओ’ हा सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला मसलेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फेडरेशन अध्यक्ष संगीता काळे, उपाध्यक्ष रेखा ढगे, सचिव निता कठारे, माधवी भोसरेकर, उज्वला कुलकर्णी यांच्यासह महिला फेडरेशनच्या पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास फेडरेशनच्या सर्व सदस्या, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.


 
Top