उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील झाडे गल्लीत घरफोडी करून ३७ तोळे सोन्याचे दागिने पळवणाऱ्या दांपत्याला अखेर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील ३१ तोळे दागिने जप्त केले. विशेष म्हणजे हे दांपत्य चोरी झालेल्या घरातील सर्वच सदस्यांच्या ओळखीचे असून घरफोडीच्या आदल्या दिवशी संपूर्ण घराची रेकी या दांपत्याने केली होती.

गजबजलेले ठिकाण असलेल्या झाडे गल्लीतील औषध विक्रेत्या रेखा बाळासाहेब पवार या पतीसह बाहेर गावी गेल्याची आणि त्यांच्या वयोवृध्द सासू घरास कडी लावून बाहेर गेल्याची संधी साधत १९ जूनला तब्बल ३७ ताेळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता गुन्हा करणारे आरोपी त्या फुटेजमध्ये घटनास्थळावरुन जा- ये करत असताना दिसुन आले. त्यानंतर प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर विक्रांत जगन्नाथ सवाईराम व सरोजा विक्रांत सवाईराम या दोघांनीच चोरी केल्याचे उघड केले. या पती- पत्नींस मुंबई येथील रबाळे रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्हा केल्याची कबुली देउन सदर गुन्ह्यातील दागिने मुळ गावी शिराळा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आपल्या घरी ठेवले असल्याचे सांगीतले. तेव्हा पोलिसांनी हे दागिने आरोपीच्या घरातून हस्तगत केले आहेत. ही कामगीरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलिस शैलेश पवार, हवालदार हुसेन सय्यद, महेबुब अरब, अमोल चव्हाण, शैला टेळे, रवी आरसेवाड यांच्या पथकाने केली आहे. रेखा व बाळासाहेब पवार यांना या प्रकारामुळे मोठा धक्का बसला. मात्र, बाळासाहेब यांनी स्वत:ला व कुटुंबीयांना सावरत स्वत:ही पोलिसांना सहकार्य करण्यासाठी शोध सुरू केला. परिसरातील कापड विक्रेते, सुवर्णकार यांच्याकडे विनंती करून सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यात सरोजा व विक्रांतच्या संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांना सहकार्यासाठी बाळासाहेब यांनीही मेहनत घेतली. दरम्यान सरोजा यांच्या फेसबुक फ्रेंन्डलिस्टमध्ये शहरातील अनेकजण आहेत. त्यांच्याकडून आणखी चोऱ्यांचा उलगडा होऊ शकतो का, याचाही पोलिस तपास करत आहेत.

 
Top