उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथे माजी सरपंच अरुण माने यांच्या पुढाकाराने आयोजित शेतीशाळेला अनसुर्डासह परिसरातील शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेतीशाळेत सोयाबीन लागवडीच्या प्रात्यक्षिकासह बीज प्रक्रिया व इतर विषयांवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत कृषी विभाग आत्मा व येडेश्वरी औद्योगिक सहकारी संस्था उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनसुर्डा गावचे माजी सरपंच अरुण माने, भाजपा नेते जीवनराव देशमुख, उपसरपंच अमोल बोंदर, ग्रामपंचायत सदस्य  तानाजी माने, अतुल भुमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 शेतीशाळेत आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नागेश उगलमुगले यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया कशी करावी, बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी, माती नमुने कसे काढावे, मूलद्रव्याचा वापर कसा करावा, एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी शेतकर्‍यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक सचिन सोनवणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी प्रकल्पातील शेतकर्‍यांना सोयाबीन बियाण्याचे वाटप करण्यात आले. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येडेश्वरी औद्योगिक सहकारी संस्थेचे प्रतिनिधी चैतन्य गुंड यांनी केले. शेतीशाळेला अनुसर्डासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top