उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.संगीता चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर सिटी पोलीस स्टेशन येथील भरोसा सेल येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रभारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत,महिला व बालविकास अधिकारी एस.वी अंकुश आदी उपस्थित होते. छोट्या छोट्या कारणांसाठी पती पत्नी यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांचे संसार उद्धवस्त होतात. अशा जोडप्यांचा संसार सुखात चालवावे म्हणून पोलीस प्रशासनाने केलेले हे कार्य अभिनंदनास पात्र आहे.तसेच स्त्रीयांवर होणारे अत्याचार, घरात मिळणारी वाईट वागणूक आणि घरेलू हिंसाचारावर आळा घालण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, असे ॲड. चव्हाण म्हणाल्या.

ड.चव्हाण यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे भेट देऊन महिला रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयातील सर्व विभागांचा निरीक्षण केला.येथील परिचाराकांशी चर्चा केली आणि त्यांना उदभवत असलेल्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डी.के पाटील यांना रुग्णालयात पिंक बॉक्स बसवण्याच्या सूचना केल्या. पिंक बॉक्सच्या सहाय्याने महिला कर्मचा-यांना आपल्या तक्रारी आणि समस्या गोपनीयता राखून मांडता येईल. या पिंक बॉक्सला फक्त कार्यालय प्रमुख किंवा सक्षम अधिकारी हेच बघू शकतील त्यामुळे तुमच्या समस्या संपूर्ण गोपनीयता राखत सोडवले जातील असेही ॲड.चव्हाण यावेळी म्हणाल्या.

ॲड. चव्हाण यांनी महिलांच्या प्रसुती पश्चात वार्डमध्ये भेट देऊन नवजात मुलींचे आणि त्यांच्या मातांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या या मुली भविष्यात नक्कीच उंच भरारी घेतील आणि त्यांच्या आई वडीलांसाठी सुख-समृद्धी आणतील. यावेळी त्यांनी सर्व रुग्णांना आणि रुगणालयातील डॉकटर्स तसेच नर्सिंग स्टाफला शुभेच्छा दिल्या. महिलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असते,तरी आपण स्वत:ही याबाबत जागरूक राहावे,असे आवाहनही ॲड.चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी ॲड.चव्हाण यांनी जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांची भेटही घेतली. त्यांना मिळणारा जेवण , वागणूक आणि इतर मुलभूत सुवधांबाबत चौकशी केली. कारागृहातील सर्व 15 महिला कैद्यांशी चर्चा करतांना त्यांनी त्यांच्या आरोग्याबाबतही विशेष विचारणा केली. कारागृहाचे अधीक्षक ए.पी शिंदे यांनी महिला कैद्यांबाबत सविस्तर माहिती सांगितली.यावेळी ॲड.चव्हाण यांनी कारागृहातील महिला कर्मचा-यांशीही संवाद साधला आणि त्यांना महिला आयोगाबाबत माहिती सांगितली. आपण देशाच्या महिलांसाठी उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी महिला कर्मचा-यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिला.

ॲड.चव्हाण यांनी यावेळी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहासही भेट दिली. येथील विद्यार्थिनींना त्यांनी  एकाग्रतेने चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला. वस्तीगृहाच्या अधीक्षिका माया कांगणे यांनी वस्तीगृहात मुलींना उपलब्ध सुविधांबाबत माहिती दिली. ॲड.चव्हाण यांनी मुलींना पिंक बाक्स आणि पिंक मोबाईल तसेच 112 क्रमांकाबाबत सूचना केल्या. सर्व विद्यार्थिनींनी आपले करिअर घडवण्यावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी मुलींना केले. वस्ती गृहात काही ठिकाणी गरम पाण्यासाठी गीझर उपलब्ध नसल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन ते उपलब्ध करावा आणि सॅनेटरी पॅडस तसेच इतर अनुषांगिक औषधी वस्तीगृहात उपलब्ध करून द्यावेत. अशा सूचनाही ॲड.चव्हाण यांनी केल्या.

 
Top