उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग ते जळकोट दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे व नळदुर्ग बस स्तस्थानकासमोरील  रस्त्यावर सांडपाणी येत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नळदुर्ग शहर बायपासचे काम देखील अनेक दिवसापासून बंद आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांच्या आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार कंपनी एसटीपीएल यांच्या अधिकाऱ्यांसह महामार्गाची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवून रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन करण्यासह अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते. तसेच घाटात जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्याच्या सूचना दिल्या.

 या अनुषंगाने एसटीपीएल कंपनीने महामार्गावरील खड्डे बुजवणे व इतर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. दिनांक ३१ मे रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग - जळकोट तसेच मैलारपूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेची राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्‍के, माजी नगरसेवक उदय जगदाळे, भाजपाचे नळदुर्ग शहर अध्यक्ष धिमाजी घुगे, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, माजी नगरसेवक सुधीर हजारे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिल विपत, टोलनाका चालक कंपनी एसटीपीएल कंपनीचे विश्वजीत महंतु, रमेश काळे, महेश उटगे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधिर मोटे यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

 यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, महामार्गावर आलेले सांडपाणी तसेच बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी केली. नळदुर्ग बसस्थानकासमोर महामार्गालगत गटार नसल्याने हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांचे सांडपाणी महामार्गावर येऊन त्या ठिकाणी निसरडा रस्ता झाल्यामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेत आठ दिवसात महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे त्याचबरोबर महामार्गावर येत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नगर परिषद संदर्भातील सांडपाणी व्यवस्थापनाचे विषय देखील तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश न प मुख्याधिकारी यांना दिले होते. या सूचनांच्या अनुषंगाने तातडीने खड्डे बुजवण्याची कामे सुरु झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 


 
Top