उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ज्या शिवसेनेने आणि उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमदार संजय राठोड यांना आयुष्यात मोठे केले. मंत्रिपदासह सर्वकाही भरभरुन दिले, त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा न करता परत उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे यावे, अशी भावनिक साद धाराशिव जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजातील कट्टर शिवसैनिकांनी व समाजबांधवांनी घातली आहे. आज दि. 26 जून रोजी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत आमदार राठोड यांना परत येण्याचे भावनिक आवाहन बंजारा भाषेतून करण्यात आले.

 युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाज बांधव आणि बंजारा समाजातील शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकवटले होते. यावेळी आमदार संजय राठोड परत या, असे भावनिक आवाहन तमाम बांधवांच्या वतीने करण्यात आले. 

 ज्यावेळी भाजपच्या चित्रा वाघ आणि इतर नेत्यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर गलिच्छ आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्ही बंजारा समाजबांधव संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो. पण आज त्याच भाजपच्या इशार्‍यावर त्यांनी शिवसेनेला सोडून जाण्याची भूमिका घेतल्यामुळे तमाम बंजारा समाजबांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेत परत यावे असे जाहीर आवाहन करीत असल्याचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय राठोड यांनी सांगितले. 

 यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख विजय राठोड, उपशहरप्रमुख युवराज राठोड, सतीश पवार, अशोक जाधव, सचिन राठोड, बाळासाहेब राठोड, महेश जाधव, संदीप राठोड, रवी राठोड, अरुण राठोड, दयानंद पवार, सुरेश राठोड, आकाश जाधव, अजय राठोड, धोंडीराम राठोड, पंकज पवार, सुनिल पवार, नितीन राठोड, रोहित राठोड, धुलाबाई चव्हाण, चांगुणाबाई पवार, सुरताबाई राठोड, शालूबाई राठोड, मंगलबाई जाधव, सीताबाई पवार, रोहिणी राठोड, छमाबाई चव्हाण  यांच्यासह युवा सेना, शिवसेना, बंजारा समाजातील युवक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


 
Top