लोहारा/प्रतिनिधी

आरक्षणामुळे जागृत झालेला ओबीसी समाज आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रस्थापितांच्या विरोधात बंड करू लागला आहे. त्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द करून पुन्हा चातुर्वण्य समाज व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ओबीसी आरक्षण हक्क संवर्धन समितीचे प्रमुख श्याम निलंगेकर यांनी केला आहे. 

ओबीसी आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने जिल्ह्यात ओबीसी आरक्षण जागरण अभियाना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने  गुरूवारी दि.23 जुन 2022 रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित आरक्षण जागर कार्यक्रमात निलंगेकर बोलत होते. यावेळी लता बंडगर, अॅड.सयाजी शिंदे, तिम्मा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. निलंगेकर बोलताना म्हणाले की, दिवंगत माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू करून ओबीसींना राजकीय आरक्षण दिले. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून व्ही.पी.सिंग यांचे सरकार पाडणारेच लोक सत्तेत आहेत. त्यांना चातुर्वण्य व्यवस्था आणायची आहे. त्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आरक्षणाची बाजू मांडून त्यासाठी प्रयत्नशील  राहणाऱ्या पक्ष व उमेदवाराला निवडून द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजय महानुर, पंडित लोहार, लक्ष्मण रोडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


 
Top