उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

 महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेला माल उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचा आहे ,या महोत्सवात आलेल्या डाळी ,विविध प्रकारचे मसाले ,आवळा आधारित विविध पदार्थ, एल ई डी बल्ब तसेच पुणे येथील सेंद्रिय युक्त विविध प्रकारचे तांदूळ या सर्व उत्पादने कौतुकास्पद आहेत. तेंव्हा उस्मानाबादच्या नागरिकांनी या महोत्सवाचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले.

 जिल्हा परिषदेच्या आवारात डाळ व तांदूळ महोत्सवाच्या उद्भाटन प्रसंगी श्री.दिवेगावकर बोलत होते. यावेळी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी रहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्राजल शिंदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बालवीर मुंडे, संस्था व क्षमता बांधणीचे जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जीकरे, एम आय एस जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट, सर्व तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापक ,तालुका व्यवस्थापक ,प्रभाग समन्वयक तसेच स्वयं सहाय्यता गटातील महिला व गावपातळीवरील विविध प्रकारचे केडर उपस्थित होते .

  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान , उस्मानाबाद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि पुणे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने डाळ आणि तांदूळ महोत्सव दि.16 व 17 जून 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे .या महोत्सवात उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या डाळी ,मसाले, आवळा आधारित विविध पदार्थ तसेच पुणे येथील सेंद्रिय युक्त विविध प्रकारचा तांदूळ , एल ई डी बल्ब आणि इतर वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा व्यवस्थापक विपणन समाधान जोगदंड यांनी केले .


 
Top