उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या ईनामी जमिनीवर सात बारा उताऱ्यात इतर हक्कात असलेल्या व्यक्तींची नावे कमी करून भोगवटदार रकान्यात देवस्थानचे नाव व इतर हक्कात वक्फ प्रतिबाधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्याचे पत्र जिल्हा वक्फ अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दिले आहे. तलाठी यांनी नोंद घेऊन सात बारा व नमुना 3 ची नक्कल वक्फ मंडळास देण्यास सांगितले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक जमिनीवर वर्ग 2 ची नोंद झाल्यावर आता वक्फ बोर्ड सक्रिय झाले असून त्याच्या मालमत्तावर चुकीच्या नोंदी कमी करण्याचे पत्र दिले आहे. वक्फच्या इतर हक्कात असलेल्या नोंदी कमी न झाल्याने काही लोक आजही बॉण्डवर नोटरी करून इनामी जमिनीची विक्री करित असल्याचे वक्फने तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात म्हण्टले आहे.

वक्फच्या जमिनीवर नोंदी फेरफार घेण्यापूर्वी परवानगीची आवश्यकता आहे मात्र ती न घेता अनेक व्यवहार केले आहेत ते सर्व खरेदी विक्री व्यवहार रद्द बातल ठरतात असे पत्रात नमूद केले आहे. फेरफार व पोट हिस्सा करण्यापूर्वी वक्फची परवानगी घेतली नसून त्यावर ईनामदार लोकांची नावे घेतली असून त्यांनी बेकायदेशीरपणे या जमिनीची विक्री केली आहे ते सर्व फेर रद्द करावेत असे म्हण्टले आहे. वक्फ जमिनीत काही जण विनापरवाना जमीन व प्लॉट विक्री करित आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत खरेदी विक्री व्यवहार करू नये असे आवाहन जिल्हा वक्फ अधिकारी अहेमद खान यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील 120 गावात वक्फ बोर्डाची 8 हजार 743 एकर जमीन आहे यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात 2 हजार 676 एकर यात, त्यापाठोपाठ तुळजापूर तालुक्यात 2 हजार 596 एकर, परंडा 1 हजार 398,उमरगा 735, कळंब 581,भुम 493, लोहारा 139 व वाशी तालुक्यात 124 एकर जागा आहे. ही जमीन विविध दर्गा, मशीद, कब्रस्थान यासह अन्य संस्थांना विविध सेवा करण्यासाठी मुतवल्ली, मशायक, इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर,नळदुर्ग,ढोकी,उस्मानाबाद,परंडा, मुरूम,भूम येथे सर्वाधिक जमीन आहेत. तेर येथे 868 एकर,नळदुर्ग 830,मुरूम 513,परंडा शहर 643,उस्मानाबाद शहर 477,भूम शहरात 193, माणकेश्वर 290 अशी जमीन आहे. सर्वाधिक जमीन  जामा मशीद यांची आहे.

 


 
Top