उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‍जिल्हयातील युवक-युवतींनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करून बेरोजगारीवर मात करावी. अनेक नव उद्योजक व्यवसायात वेळेत आणि व्यवस्थित मार्गदर्शनाभावी निराश होऊन जातात. उस्मानाबाद जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या मेळाव्यातून नक्कीच जिल्ह्याला चांगले उद्योजक मिळूतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे व्यक्त.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात जिल्हा स्वयंरोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री.दिवेगावकर बोलत होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व पुणे येथील युथ एड फाऊंडेशन आणि येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नामधून राज्यातील लघू उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी “ एक पाउल स्वंयरोजगाराकडे ” या उपक्रमाची सुरवात दि. 10 ते 12 जून 2022 या कालावधीत राज्य उद्यमिता यात्रा, प्रशिक्षण शिबिराचे व स्वंयरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन  समाज कल्याणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  आणि  जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सर्वप्रथम राज्य उद्यमिता यात्रेच्या बसचे फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी वाघमारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत ,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.हणबर, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे, भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक श्री.मुकेशकुमार, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी आणि पुणे येथील उद्यमिता यात्रा युथ एड फाऊंडेशनचे मनोज भोसले, श्री.घनशाम आणि ज्ञानेश्वर मस्के आदी उपस्थित होते.

 युवकांनी आपला अमुल्य वेळ वाय घालू नये.उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी अनुभवी लोकांची मदत घ्यावी. जुन्या पिढीच्या अनुभवांचा लाभ घेत पारंपरिक कौशल्यांना आधुनिक्तेची जोड देऊन त्यातून प्रगती करा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करा. वाचनामुळे विचारांमध्ये परिपक्वता येते. वेळ काढून चांगली पुस्तके वाचा. स्पर्धा परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास खच्चून जाऊ नका,जगातील मोठ्या उद्योजकांनी जीवनात अनेकवेळा अपयश पचवून यशाचे नवीन शिखरं गाठली आहे.त्यांचे चरित्र वाचा. अपयशातून स्वत:च्या यशाचा मार्ग शोधण्यासाठी आपला कम्फर्ट झोन सोडावा लागते.मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही . कुठलाही काम किंवा रोजगार छोटा नसतो, तेंव्हा इतरांना कमी लेखने बंद करा. लघु उद्योगाला इंटरनेट आणि सोशल प्लेटफॉर्मच्या सहाय्याने जगभरात पोहोचवा.असेही श्री.दिवेगावकर यावेळी म्हणाले.

 देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरीच्या संधी कमी होत आहेत. मात्र हीच लोकसंख्या ग्राहक सुध्दा आहे. त्यामुळे आपल्याला उद्योग आणि व्यवसायासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. प्रामाणिकपणे स्वत:चे पोट भरण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करणे महत्वाचे आहे. या वातावरणात स्वयंरोजगार शोधुन चांगले उद्योजक व्हा. या संधीचा सर्व इच्छुक व्यवसायिकांनी लाभ घ्यावा तसेच युवकांनी तांत्रिक कौशल्यावर भर देऊन कमी होणाऱ्या शासकीय नोकऱ्यांच्या मागे न लागता कौशल्य आधारीत प्रशिक्षण घेउन स्वयंउद्योजक बना असा कानमंत्रही श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिला.

 श्री.गुप्ता यांनी जास्तीत जास्त युवक- युवतींनी कौशल्य ‍विकास व उद्योजकता प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार आणि व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.जिल्हा परिषदेतर्फे शाळांमधून उद्योजक्ता प्रशिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याबरोबरच कॉम्प्युटर प्रओग्रामिंग शिकवण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 या कार्यक्रमात 360 उमेदवार व त्यांचे पालकांनी सहभागी होऊन विविध यंत्रणाच्या स्टॉलला भेटी देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. या कार्यक्रमात 12 शासकीय महामंडळे,कार्यालये यांनी स्टॉल लावुन स्वयंरोजगार योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर या उद्यमिता यात्रेच्या प्रशिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र व शासकीय आयटीआय या संस्थांना भेटी देऊन उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 राज्यव्यापी उदयोमिता यात्रेचे राज्य समन्वयक मनोज भोसले यांनी कौशल्य विकास व उद्योजकता ‍विभाग व युथ एड फांडेशनच्या या लघु उदयोजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले. त्यांनी राज्यव्यापी उद्यमिता यात्रा व स्वयंरोजगार मेळाव्याचा उद्देश तसेच प्रशिक्षण शिबीराची माहिती दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यालयाचे ‍अधिकारी आणि कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती काळे यांनी केले तर एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी पांडूरंग मोरे, यांनी आभार मानले.

 
Top