उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वारसा हक्कात सातबारावर नोंद घेण्यात यावी याकरिता तेरखेडा येथील शेतकरी शांतलिंग रंगनाथ कुंभार हे चार वर्षापासून प्रशासनदरबारी हेलपाटे मारत आहेत. जमिनीवर कब्जा केलेल्या व्यक्तीकडे कोणताही पुरावा नसताना आणि चारवेळा कागदपत्रांची पडताळणी व  फेरतपासणी होऊन सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या शांतलिंग कुंभार यांनी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना   दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, तेरखेडा येथील सर्व्हे नं. 369, 370, 371 व गट नं. 1223,, 122, 1225, 1226, 1227 मधील जमिनीसंदर्भात कळंबचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी या प्रकरणात कुंभार यांच्या बाजूने निकाल दिलेला असून त्याविरोधात शांतिलाल बोराणा, कांतिलाल बोराणा, माणिक बोराणा यांनी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यांच्याकडे पुरावा नसल्यामुळे त्यांनी हे अपील मागे घेतले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिलेला निकाल कायम राहिला. तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही. या जमिनीचे क्षेत्र राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 52 करिता संपादीत झालेले असून महसूल व मोजणी विभागातील काहीजणांच्या संगनमताने जमीन स्वतःच्या नावे हडप करण्याचा प्रयत्न बोराणा यांनी केला असल्याचेही निवेदनात नमूद करुन दत्तू विठोबा कुंभार यांच्या नावावरील जमीन कुठल्या आधारे गाव नमुना 12 आधारे कमी झाली, केवळ अशिक्षित असल्यामुळे याचा गैरफायदा घेऊन जमीन हडप करण्याचा प्रयत्न बोराणा हे करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
Top