उमरगा  / प्रतिनिधी-

भारतीय जनता पक्षाचा तरूण, मितभाषी चेहरा असलेले, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय कैलास शिंदे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. येत्या चार दिवसात त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित होईल असे सांगितले जात आहे. 

उमरगा तालुक्याच्या राजकारणात भाजपाने गेल्या एक दशकापासुन चांगले जम बसविले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, उमरगा बाजार समिती, ग्राम पंचायत आणि नगर परिषदेत सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत, त्यात भाजपाचे जेष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन यांच्यासह सक्रिय व जेष्ठ कार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास शिंदे यांचाही पुढाकार तितकाच महत्वाचा ठरलेला आहे. जेष्ठ नेते (कै.) शिवाजीराव चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अँड. अभय चालुक्य, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, हर्षवर्धन चालुक्य, माधव पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न केले झाल्याने तरूण कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूकांची संख्याही वाढते आहे. 

दिग्विजय शिंदे पक्ष सोडणार !  

भाजपामध्ये गेल्या ३०, ३५ वर्षापासुन सक्रिय असलेले व उमरगा विधानसभा निवडणूक लढवलेले कैलास शिंदे सध्या पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत. मात्र त्यांचे सुपुत्र दिग्विजय शिंदे पक्ष सोडणार असल्याची चर्चा होत आहे. श्री. शिंदे यांनी पक्षासाठी केलेले कार्य मोलाचे असले तरी त्याचे फळही त्यांना मिळालेले आहे. कैलास शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली, त्यात ते पराभूत झाले तरी पक्षाबरोबरच स्वतःची प्रतिमा निर्माण झाली. जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्षपद मिळाले. सुपुत्र दिग्विजय यांना जिल्हा परिषद सदस्य आणि आणि समाजकल्याण सभापती होण्याचा मान मिळाला. दरम्यान पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्व बाजुंनी प्रयत्न करूनही पक्षांतर्गत कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची खदखद श्री. शिंदे यांना वाटते. म्हणुनच कि काय दिग्विजय दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळते आहे. दिग्विजय यांना विविध कंपन्याचे घड्याळ वापरण्याचा छंद आहे मात्र ते आता राजकिय पटलावर येण्यासाठी हातात अधिकृत “घड्याळ” बांधतील. अशी शक्यता दिसते आहे. मुलाच्या  पक्षांतराबाबत भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. शिंदे यांना विचारले असता, त्यांनी “तो” निर्णय मुलाचा असू शकतो. असे सांगुन अधिक भाष्य टाळले.

 
Top