उस्मानाबाद / प्रतिनिधी -

येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलचे इयत्ता दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली असून या हायस्कूलचा ९९.२० टक्के निकाल लागला आहे.

इयत्ता दहावीसाठी ८९६ विद्यार्थी समाविष्ट होते. त्यापैकी ८९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून राज्यात सर्वात जास्त परीक्षेला विद्यार्थी बसविणारी ही एकमेव प्रशाला आहे. यामध्ये १०० पैकी १०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले ८ तर ९५ टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे १३८ तसेच ९० ते ९५ टक्के गुण घेणारे १७३ व ९० टक्के गुण घेतलेले ४२६ तसेच ५० ते ७५ गुण घेणारे १५८ व ५० टक्क्यापेक्षा कमी गुण घेणारे ८ विद्यार्थी आहेत. ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबादचे विस्तार अधिकारी संजीव बागल, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्था सचिव प्रेमाताई पाटील, प्राचार्य साहेबराव देशमुख, सदस्य तथा वित्त अधिकारी संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेत वर्षभर राबविली जाणारे उपक्रम व शिक्षकांनी अहोरात्र घेतलेले कष्ट तसेच संस्थेने केलेल्या सहकार्याचा परिपाक म्हणजे आजचे हे देदीप्यमान यश आहे. तर विस्तार अधिकारी संजीव बागल यांनी यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तर सुधीर पाटील म्हणाले की, लातूरच्या धर्तीवर आपण उस्मानाबादमध्ये उच्च शिक्षणामध्ये उस्मानाबाद पॅटर्न तयार करणार आहोत. सर्व प्रकारच्या ११ वी व १२ वीसाठी भौतिक सुविधा दिल्ली,  हैदराबाद व कोटा येथील तज्ञ प्राध्यापक वर्ग फोटॉन व फिनमिनल बॅच ११ वी व १२ वीसाठी नीट व जेईई परीक्षेच्या तयारीसाठी केलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी श्रीपतराव भोसले जुनिअर कॉलेजमध्ये आपला प्रवेश घेऊन उस्मानाबादच्या लौकिकात भर घालावी. तर लातूरच्या शाहू कॉलेजपेक्षाही आम्ही सुविधा व गुणवत्ता देत आहोत. तसेच ५ वीपासून सीबीएससी अभ्यासक्रमासाठी फाउंडेशन बॅच सुरू केली असून त्याचा फायदा नीटसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी यांनी मानले.

 
Top