उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यामध्ये “शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ” या अभियानाअंतर्गत अतिक्रमित शेत व पाणंदरस्ते मोकळे करण्याचे अभियान शेतकऱ्यांच्या सहभागाने सुरु आहे.अस्तापर्यत 691 रस्ते या अभियानात अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहेत . जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व अतिक्रमित शेतरस्त्याबाबत त्यांची काही तक्रार असल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले .

 आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून कृषी विकासामध्ये शेतरस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शरीरातील धमण्या कार्यक्षम असल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते. त्याचप्रमाणे शेतीला शेतरस्ते उपलब्ध असल्यास शेतकरी बांधवाकरिता सर्व हंगामांमध्ये कृषी निविष्ठा, कृषी उपकरणे, वाहने यांच्या सहाय्याने शेती करणे सुकर आणि फायदेशीर ठरते. परंतु अतिक्रमित शेतरस्ते, शेतावरील बांध आणि रस्त्यांच्या भांडणासाठी महसूल न्यायालय आणि दिवाणी न्यायालयातील वाढत्या प्रकरणांची आणि  जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संख्या विचारात घेता शेतरस्ते , पाणंद रस्ते आणि पोहोच रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा असल्याचे जिल्हा प्रशासनास दिसून आले आहे. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने वारंवार चर्चा व विचार करुन शेतरस्त्यांना मोकळा श्वास देण्याकरिता एक व्यवहार्य व प्रत्यक्षात अंमलात येईल अशा “शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ” या योजनेला मूर्त स्वरुप दिले आहे. या योजनेमध्ये गाव पातळीवरील शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक,  पोलीस पाटील, कोतवाल यांच्यामार्फत अतिक्रमित शेतरस्ते मोकळे करण्याचे अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

  या अभियानांतर्गत नोव्हेंबर २०२० ते मे २०२२ या कालावधीमध्ये 691   अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत . रस्ते अतिक्रमणमुक्त केल्यामुळे 28 हजार 887 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे “शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ” या अभियानाचा शेतक-यांनी अवश्य लाभ घ्यावा असेही श्री.दिवेगावकर यांनी आवाहन केले.


 
Top