उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशातील तमाम महिलांचा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांचा अपमान करणारे वक्तव्य केले आहे. असा आरोप करून, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दि. २६ मे रोजी प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद शहरात चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला.

 उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौकात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिर्का­यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारले. चंद्रकांत पाटील यांचा निषेध असो, भाजपाचा धिक्कार असो, चंद्रकांत दादा माफी मागा अशा घोषणा दिल्या. यावेळी बोलताना सक्षणा सलगर म्हणाल्या की, मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 त्या अनुषंगाने खा. सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रात पण ओबीसी आरक्षण मिळायला काय अडचण आहे, असे बोलल्या होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. तुम्ही राजकारणामध्ये कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, तुम्ही खासदार आहात ना, एका मुख्यमंर्त्याची भेट कशी घ्यायची हे कळत नसेल तर तुम्ही दिल्लीतह्याही तर मसणात जा शोध घ्या आणि आरक्षण द्या असे म्हणाले, भाजप व चंद्रकांत पाटील हे महिला द्वेष्टे आहेत. त्यांना महिलांचे नेतृत्व का नको आहे.

 महिलांनी फक्त चुल आणि मुल बघायचे का, चंद्रकांत पाटील यांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा दिला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असून त्याची सुरुवात उस्मानाबाद येथून केली असल्याचे सलगर म्हणाल्या..या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष संगीता काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा केंद्रे, शहर उपाध्यक्ष आरती आंबेकर, शहर कार्याध्यक्ष कमल चव्हाण, सदस्य सुषमा शिंदे, मानसी आंबेकर, श्रद्धा पाटील, ज्योती गायकवाड, तनुजा घोलप यांच्यासह युवती कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


 
Top