उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्या प्रकरणी मंदिर तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे नोटीसीत नमूद असून सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कारडे यांनी ही नोटीस काढली आहे. प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अवमान प्रकरणी कारवाईसाठी तुळजापूरकरांनी काल तुळजापूर शहर बंद ठेवले होते व कारवाईचे निवेदन दिले होते त्या अनुषंगाने आता प्रशासकीय कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येते. संभाजी महाराज यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्धा गाभाऱ्यात सोडले नाही.

छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त आहेत तर कार्यकर्ते आक्रमक आहेत. तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरी देखील नागरिक जिलहाधिकारी, तहसीलदार, व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.

 
Top