उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे निजाम राजवटीतील जनतेनेही स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी लढा उभारला. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याइतकेच हैदराबाद मुक्ति संग्रामाच्या लढ्याला महत्व आहे. पुढील पिढ्यांना मुक्तिसंग्रामाचा धगधगता इतिहास अवगत होण्यासाठी या लढ्यावर अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत इतिहास संशोधक प्रा.डॉ.सतीश कदम यांनी व्यक्त केले.

 हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्मा गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा गणपतराव देशमुख बहुद्देशीय स्मारक समितीच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव सोहळा छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे गुरुवारी (दि.5) सायंकाळी पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

     प्रारंभी भाई कै. उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंचावर शिक्षण तज्ज्ञ एम.डी. देशमुख, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.रमेश दापके-देशमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.जयसिंगराव गणपतराव देशमुख, सौ.उषादेवी मनोहर देशमुख, डॉ.दीपिका अमोल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमात डॉ.सतीश कदम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. निजाम राजवट कशी होती? रझाकार होण होते? निजामशाहीत हिंदू-मुस्लिम समाजाचे संबंध कसे होते? यासह अनेक प्रश्नांची उकल त्यांनी आपल्या व्याख्यानात केली. स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदान आणि त्यांनी गावातील जनतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा प्रास्ताविकपर मनोगतात केला. तसेच कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आनंद वीर यांनी केले. आभार काटी गावचे सरपंच आदेश कोळी यांनी मानले. कार्यक्रमास राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भाई धनंजय पाटील, अ‍ॅड. अविनाश देशमुख, अस्मिता देशमुख, हुतात्मा गणपतराव देशमुख स्मारक समितीचे अध्यक्ष हितेश देशमुख, डॉ.सचिन देशमुख, छात्रसेन देशमुख, काटीचे सरपंच आदेश कोळी, माजी उपसरपंच बाबुमिया काझी, पत्रकार उमाजी गायकवाड, उद्योजक अमरसिंह देशमुख, विजयसिंह देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लाडुळकर, अजय देशमुख, बरतर काझी, अमित देशमुख,आदीसह उस्मानाबाद शहर तसेच काटी गावातील नागरिक उपस्थित होते.

 नवरत्नांचा सन्मान

हुतात्मा गणपतराव देशमुख बहुद्देशीय स्मारक समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख, सौ.उषादेवी मनोहर देशमुख,  राजेंद्र रामचंद्र देशमुख, रा.प.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, उपप्राचार्य सुधीर सूर्यकांत पांगे, सन उद्योग समूहाचे अमरसिंह देशमुख, किर्ती जमदाडे, काझी सय्यद सुजातअली, डॉ.सौ.दीपिका अमोल देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 
Top