उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात मोठया प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे, रासायनिक खते आणि पीक कर्ज वेळेत उपलब्ध करुन  खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभाग आणि बँकांनी दक्षता घ्यावी ,अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केली.

श्री.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप-2022 हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले,कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैंन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विकास जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर ,प्रकल्प संचालक (आत्मा) जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

 गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.बियाणे आणि खतांची टंचाई निर्माण होणार नाही याकडे कृषी विभागाने प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन बियाण्याची तपासणी करुन त्याच बियाण्याचा वापर शेतकरी  पेरणीसाठी करत आहेत ही चांगली बाब आहे.शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी खते आवश्यक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे जिल्ह्याला जास्तीचा 10 हजार क्विंटल खतसाठा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, सध्या जिल्ह्याला 75 हजार क्विंटल  खतसाठा मंजूर आहे. उस्मानाबाद हा आकांक्षीत जिल्हा असल्याने जिल्ह्याला आवश्यक‍ तेवढे खत उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही श्री.गडाख म्हणाले.मागच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना 1200 कोटी पीककर्जा देण्यात आले होते.यावर्षी 1600 कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठीही बँकांनी योग्यवेळी पीककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील विविध बँकाच्या शाखांकडे सातत्याने पाठपुरावा करावा आणि तालुका पातळीवर बॅंकांच्या आढावा बठकी आयोजित करण्यात याव्यात.तसेच  खरीप हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी पीक कर्ज मेळावे आयोजित करावे.यावर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी तालुका स्तरावर डी.डी.आर,उपजिल्हाधिकारी आणि बॅंक अधिका-यांची समिती तयार करण्यात येईल आणि दर आठवड्याला 15 मे ते 15 जून पर्यंत सातत्याने त्यांच्या आढावा बैठकी घेण्यात येतील असे सांगितले.श्री गडाख यांनी 15 जून पर्यंत 50 टक्के कर्जवाटप करण्याबाबतही बॅंक अधिका-यांना निर्देश दिले.

पीक कर्जापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.पीक कर्ज मिळत नसल्याबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याबाबत बँकांनी दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा बॅंकानीही मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करावे असेही पालकमंत्री म्हणाले.संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत असे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ऊस शेतक-यांनी काळजी करू नये असेही श्री.गडाख यावेळी म्हाणले.

यावेळी आढावा बैठकीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले.ते म्हणाले खरीप हंगाम 2022 मध्ये एकूण 6 लाख 22 हजार 435 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.त्यात 3 लाख 94 हजार 654 हेक्टरवर सोयाबीन क्षेत्र प्रस्तावित आहे.जिल्ह्यातील सोयाबीन पीकाची सरासरी उत्पादक्ता 1060 किलो प्रती हेक्टर आहे.ही वाढविण्यासाठी बीज प्रक्रीया, बियाणे उगवम क्षमता तपासणी,खतांचा संतुलित वापर आणि बी.बी .एफ़ आधारे पेरणी करावी असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

यावेळी विजे अभावी पीकांचे नुकसान होवू नये यासाठी महावितरणच्या अधिका-यांनी विजेच्या तक्रारींवर लवकर काम करावे असे निर्देशही दिले.तसेच सर्व संबधित विभाग आणी अधिका-यांनी शेतक-यांचे प्रशन सोडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहनही केल. तत्पूर्वी शेती आणि शेतीविषयी कामांमध्ये उल्लेखनीय  कामगिरी केलेल्या शेतकरी दामपत्यांचेही पालकमंत्री यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

 
Top