उस्मानाबाद / प्रतिनिधी

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून ओबीसींचे आरक्षण टिकवावे या मागणीसाठी राज्यभरातून आंदोलने केली जात आहेत. या प्रश्नावर सरकारला जाग आणण्यासाठी बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी मुंबई येथे मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, माजी मंत्री संजय कुटे हे करणार असून या मोर्चामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी केले आहे.

 मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडल्यामुळे या राज्यातील ओबीसींचे आरक्षण टिकले आहे. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आरक्षणविरोधी भूमिका घेऊन ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याचा सणसणीत आरोप विजय शिंगाडे यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डाटा सादर करा असे भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने सुरुवातीपासून शासनास सांगण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडीचे नेते व मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात मग्न होते. वर्षभरानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला तर त्यांना निधी उपलब्ध करुन दिला नाही. मध्यप्रदेश सरकारने मागास आयोग नेमून एम्पिरिकल डाटा व ट्रीपल टेस्ट पूर्ण करुन सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण टिकविण्यात मध्यप्रदेश सरकार यशस्वी झालेले आहे.

 त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी न्यायालयात इम्पिरिकल डाटा सादर करुन भक्कमपणे बाजू मांडून महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण टिकवावे याकरिता झोपेचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्र सरकारला जाग यावी म्हणून 25 मे रोजी मुंबई येथे मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ओबीसींची ताकद दाखवावी, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी केले आहे.

 
Top