उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी ढगांच्या कडकडाटासह विजांचे तांडव व वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. उमरगा तालुक्यात वीज कोसळून दोन बैल ठार झाले तर उस्मानाबाद तालुक्यातील रुई ढोकी  येथील शेतकरी महिला वैष्णवी घुटे या शेतात कांदा काढण्याचे काम करीत होत्या त्याच वेळी त्यांच्या बाजूला वीज कोसळी त्यानंतर त्या बेशुध्द पडल्या. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

येरमाळा, येडशी, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा अशा विविध भागात शुक्रवारी सायंकाळी प्रचंड विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने द्राक्षबागासह आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच काही ठिकाणी काढणीला आलेल्या रब्बीच्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील दुधगाव येथे ही कसबे यांच्या घरावर वीज कोसळून झालेल्या नुकसानीत १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. 

शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतात चिखल झाल्यामुळे ऊस तोडणीसाठी अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. वादळी वाऱ्याने उस्मानाबाद शहरातील वीज पुरवठा सायंकाळी खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

 
Top