उस्मानाबाद / प्रतिनिधी-

‘सर्वांसाठी आरोग्य’ या दृष्टीकोनातून ‘आयुष्मान भारत’ या अभियानांतर्गत ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ दि.२३ सप्टेंबर, २०१८ रोजी माननीय प्रधानमंत्री ना. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याद्वारे देशभरात लागू करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी रु. ५ लाख पर्यंतची आरोग्य सेवा पुरविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सदर उद्देश पूर्ण करण्यासाठी व लाभार्थ्यांना १००% कार्ड वाटप करण्याच्या दृष्टीने या योजनेला व्यापक प्रसिद्धी देवून प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समाजातील गरजू रुग्णांना याची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी या योजनेबद्दल जनजागृती करावी तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात अडकवण्याचे सुचित केले आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांनी दि.१८.०४.२०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील ‘आयुष्यमान भारत’ योजनेतील ४३२२१५ लाभार्थ्यांपैकी केवळ ७५००० म्हणजे २०% पेक्षा कमी लाभार्थ्यांना या योजनेचे कार्ड वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. म्हणजेच आणखी भरपूर लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वा माहितीपासून अनभिज्ञ आहेत असे दिसते. या अनुषंगाने या योजनेला व्यापक प्रसिद्धी देवून १००% कार्ड वाटप करण्याच्या दृष्टीने १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ‘आयुष्यमान भारत’ योजनेची माहिती देणे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी दर्शनीय भागात उपलब्ध करून देण्याची  गरज व्यक्त केले.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पूर्णतः भारत सरकारद्वारे आरोग्य आर्थिक सहाय्य देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी योजना आहे. ही योजना भारतातील सार्वजनिक आणि खाजगी सूचीबद्ध (listed) रुग्णालयात दुय्यम आणि तृतीयक आरोग्य उपचारांसाठी प्रति कुटुंब, प्रति वर्ष ५ लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य देते. म्हणजेच त्या कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य याचा वापर करू शकतील. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ३ दिवस अगोदर आणि १५ दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतर, आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उपलब्ध केली जातात. ही एक पोर्टेबल योजना आहे म्हणजेच लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी सूचीबद्ध रुग्णालयात याचा लाभ घेऊ शकतात. योजनेमध्ये सुमारे १,३९३ प्रक्रिया आणि पॅकेजेस समाविष्ट आहेत जसे की वैद्यकीय तपासणी, उपचार, औषधे, पुरवठा, निदान सेवा, डॉक्टर फी, रूम फी, O-T आणि I-C-U फी, रुग्णालय अन्न खर्च, उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत या बाबींचा समावेश आहे.

लाभार्थींची निवड सामाजिक-आर्थिक जात गणना (SECC २०११) च्या आधारे या योजनेंतर्गत केली जाते. या योजनेची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन वेबसाईट (www.pmjay.gov.in) सुरु केली आहे. या संकेतस्थळावर आपण लाभार्थ्यांची यादी तपासू शकता. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, उस्मानाबाद यांच्यासोबत चर्चा झाली असून सर्व ग्रामसेवकांना ‘आयुष्मान भारत’ या योजनेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी व समाजातील गरजू रुग्णांना याची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये या योजनेबद्दल जनजागृती करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामसभेमध्ये डकविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

 
Top