तुळजापूर / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध राज्याचे माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. देश व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत अशा सन्माननीय व्यक्तीच्या घरावर हल्ला करणे अत्यंत निषेधार्ह आहे या घटनेचा आपण जाहीर निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली आहे. 

लोकशाहीमध्ये सर्वांना आपले हक्क मागण्याचा अधिकार आहे. परंतु सनदशीर मार्गाने प्रत्येकाने आंदोलन केले पाहिजे, कर्मचाऱ्यांनी केलेला प्रकार अत्यंत चुकीचा आणि लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे. आज पर्यंत अनेक एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार यांनी एसटीच्या संघटना आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला आहे.  महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा भूमिका मांडलेली आहे तरीही असा प्रकार होणे धक्कादायक आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने  कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला असताना देखील हा प्रकार होणे दुर्दैवी आहे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने माजी मंत्री चव्हाण यांनी केली

 
Top