उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र व राज्यातील सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत हक्काचे आरक्षण मिळविण्याकरिता 5 एप्रिल ते 17 मे या काळात महाराष्ट्रभर ओबीसी संघर्ष रथयात्रा काढून समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन या रथयात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असून 17 मे रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर समारोप होणार  असल्याची  माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महादेव माळी, खलील सय्यद, विशाल शिंगाडे, लक्ष्मण माने, डी.एन. कोळी, रवी कोरे आदींची उपस्थिती होती. 

 यावेळी बोलताना श्री.बारसकर म्हणाले, देशात 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षणासह इतर सुविधा देण्याची शिफारस बी.पी. मंडल आयोगाने केलेली होती. 1989 साली व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंडल आयोगाचा प्रस्ताव मान्य करुन ओबीसींना सभागृहात आरक्षण मंजूर केले. त्यावेळी आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 31 याचिका दाखल झाल्या. त्या निकाली निघण्यासाठी 1992 साल उजाडले. म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना 45 वर्षे आरक्षणासाठी वाट पहावी लागली. आरक्षण मिळून 25 वर्ष झाली नाहीत तोच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण काढून घेतले आहे. यापुढील काळात शैक्षणिक आणि नोकर्‍यांमधील आरक्षण काढून घेतले जाईल अशी भीती देखील श्री. बारसकर यांनी व्यक्त केली. 

म्हणून ओबीसी आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तुळजापूर ते आझाद मैदान मुंबई  ओबीसी संघर्ष रथयात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. या रथयात्रेत महाराष्ट्रातून ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. 


 
Top