उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूरचे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासनाकडे हस्तांतरण करावे व उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ तातडीने निर्माण करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्हयातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांची शासकीय शुल्कामध्ये तंत्रशिक्षणाची सोय होवून या भागाचा शैक्षणीक व आर्थिक विकास व्हावा यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करावे, पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास महाविद्यालयासाठी मेंटर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्त करावे तसेच उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राचे रुपांतर स्वतंत्र विद्यापीठात करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

सामंत शनिवारी सोलापूर येथे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. बैठकीचा निरोप उशिरा प्राप्त झाला असून काही पूर्व नियोजित कामांमुळे बैठकीला उपस्थित राहता येणे शक्य नसल्याने आमदार पाटील यांनी फोनद्वारे त्यांच्याशी चर्चा केली व आजच पत्र देवून स्वतंत्र विद्यापीठ मंजुरी व श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शासनाकडे हस्तांतरण या विषयांबाबत अवगत केले आहे.


 
Top