उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आपल्या जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयामध्ये आहे. आकांक्षित जिल्हा (निती आयोग ) अंतर्गत कृषि विभागाच्या सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रामध्ये वाढ करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी विमा संरक्षित क्षेत्रात वाढ करणे, सुधारीत बियाणे वाटप,मुख्य पिकांच्या उत्पादकता वाढविणे,उच्च मुल्य पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे, खरीप आणि रब्बी मुख्य पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे,जमिन आरोग्य पत्रिका वितरण या योजना आणि बाबींचा समावेश आहे. सलग दोन वर्ष निती आयोगाकडून कृषि आणि जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल तीन कोटी रूपयांचे  बक्षीस जिल्हयास मिळालेले आहे.

प्राप्त बक्षीस रक्कमेतून पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी नाविण्यपूर्ण बाब म्हणून  एकूण 508 रुंद वरंबा आणि सरी यंत्र (बीबीएफ) यंत्र, बियाणे प्रतवारी करण्यासाठी  1587 स्पायरल सेपरेटर आणि 1500 स्थानिक बियाणे कीटचे वाटप डीबीटी प्रणालीव्दारे करण्यात येत आहे.

खरीप हंगामामध्ये सोयाबीन,तुर,मुग,उडीद,कापुस आणि मका  या पिकांची रुंद वरंबा आणि सरी यंत्राव्दारे पेरणीकेल्यामुळे एकरी  कमी प्रमाणात  बियाणे लागते, अतिपर्जन्यमान झाल्यास  सरीमधून अतिरीक्त पाणी निघून गेल्यामुळे पिकास कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. निविष्ठा खर्चामध्ये 20 ते 25 टक्के बचत होऊन उत्पन्नामध्ये 25 ते 30 टक्के वाढ होण्यास मदत होते. तसेच पिकास मुबलक हवा,सुर्यप्रकाश मिळाल्याने  पिकाची जोमदार वाढ होऊन पिके किड व रोगास बळी पडत नाहीत, पिकांमध्ये आंतरमशागत करणे,उभ्या पिकात सरीमधून ट्रक्टर,मनुष्यचलित फवारणीयंत्राव्दारे कीटकनाशक फवारणी शक्य होते.सरीवरंबा पध्दतीचा अवलंब केल्याने जमीनीची धुप कमी प्रमाणात होऊन सेंद्रीय कर्बाचा ऱ्हास थांबल्याने जमिनीची  जलधारण क्षमता वाढते आणि जमिनीची सच्छीद्रता वाढून जमिन भुसभुशीत होते. निती आयोगाच्या प्राप्त बक्षीस रक्कमेतून वाटप केलेल्या बीबीएफ यंत्रामुळे यावर्षी कृषि विभागाने 20000 हेक्टरवरती बीबीएफव्दारे पेरणीचे नियोजन केलेले आहे.

 जिल्हयामध्ये वाटप करण्यात आलेल्या 1587 स्पायरल सेपरेटरमुळे बियाण्याची प्रतवारी केल्यामुळे चांगल्या दर्जाचे बियाणे मिळण्यास फायदा होणार आहे. तसेच बियाण्यांचे ग्रेडिंग केल्यामुळे दर ही चांगला मिळणार आहे.  1000 स्थानिक  भाजीपाला बियाणे किटच्या माध्यमातून स्थानिक बियाणे उपलब्ध होण्यास मदत होऊन आहार चांगला मिळण्यास मदत होणार आहे. स्थानिक जातींच्या बियाण्यांची जोपासना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील बियाणे निर्मितीतून रोजगार उपलब्ध होणार आहे. 

 जिल्हयातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात बीबीएफ यंत्राव्दारे  कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली पेरणी करावी आणि स्थानिक भाजीपाला बियाणे किट  खरेदी करुन स्थानिक जातींच्या बियाणांचा वापर मोठया प्रमाणात वाढवावा असे आवाहन श्री.दिवेगावकर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

 
Top