उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ‘जय भवानी - जय शिवाजी’ या जयघोषाने सत्तेत आलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेल्या  तुळजापूरला विकास निधी देताना मात्र दुजाभाव करतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्ते सुधारणा करण्याकरिता ठाकरे सरकारने दिलेल्या एकूण निधीच्या केवळ ७ % निधी तुळजापूर मतदार संघात देण्यात आला असून निधी वितरणाबाबत तुळजापूर वर एवढा अन्याय का असा खडा सवाल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘भाजपा आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत काक्रंबा ता. तुळजापूर येथे बोलताना केला.

 सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी गेल्या अडीच वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी, तुळजापूर तालुक्यासाठी आणि आपल्या गावासाठी नेमके विशेष काय केले ? हे सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आता निर्माण झाल्याचे आ. पाटील म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी वर पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला. विरोधी पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवली. मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांची वीज तोडणी कधीही झाली नाही. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीची मदत आपल्याला तातडीने मिळत होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

 जिल्ह्यातील अनेक महत्वाचे विकास प्रकल्प ठाकरे सरकारने रखडवले आहेत. वितरित निधीबाबत देखील मोठा दुजाभाव केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात देण्यात आलेल्या निधीतील २५% हक्काच्या निधी ऐवजी केवळ ७ % एवढाच निधी तुळजापूर मतदार संघात देण्यात आला असून जय भवानी जय शिवाजी च्या घोषणेने सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांकडून आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेल्या तुळजापूर तालुक्यावर एवढा अन्याय का असा खडा सवाल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी काक्रंबा येथे बोलताना केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, युवा नेते विनोद पिटु गंगणे, मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे, सज्जनराव साळुंके, बापू कणे, आनंद कंदले, प्रशांत लोमटे, शिवाजी गोरे यांच्यासह काकरंबाचे सरपंच अनिल बंडगर, उमेश पाटील, हरिदास वट्टे, पदमराज गडदे, अर्जुन कोळेकर, महादेव शिंदे, नितीन कोकरे, दत्ता कोळेकर, उमेश पांडागळे, दगडू वट्टे, नंदकुमार देवगुंडे, अनिल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top