उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानामध्ये सुधारणा केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षापासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र धोरण 2015 ला निश्चित केलेल्या 17 पैकी 9 ध्येय केंद्राने घेतली आहेत. या 9 पैकी किमान 1 ते जास्तीत जास्त 3 ध्येये घेऊन प्रत्येक ग्रामपंचयातीला एक काम करावयाचे आहे. यासाठी 24 एप्रिल या पंचायत राज दिनाचे औचित्य साधून प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामसभा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जगातून गरिबीचे उच्चाटन करणे आणि पृथ्वीचे रक्षण करणे तसेच 2030 पर्यंत जगातील सर्व लोकसंख्येला शांतता आणि समृद्धी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2015 ला 17 ध्येये निश्चित करण्यात आलेले आहेत.

भारत या करारावर स्वाक्षरी करणारा प्रमुख देश आहे. भारतात ही ध्येये साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थेचे योगदान महत्वाचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत विकास आराखडे तसेच विविध विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून या 17 ध्येयाची पूर्तता करण्यासाठी या ध्येयांचे स्थानिकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्राने 9 संकल्पना निश्चित केल्या आहेत. विषयाधारित भूमिका स्वीकारण्याबाबत सूचित केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचयातीमध्ये दि. 24 एप्रिल 2022 रोजी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ग्राम सभा घेतली जाणार आहे. ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतने 9 पैकी किमान 1 संकल्पना आणि जास्तीत जास्त 3 संकल्पना निवडून त्यावर ग्रामसभेत ठराव मंजूर केला जाणार आहे आणि त्यावर पुढील वर्षभर काम केले जाणार आहे. निवडलेल्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये विविध योजना उपक्रम हाती घेणे, त्याला व्यापक प्रचार प्रसिद्धी देणे, जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमांत सहभागी करून घेणे आणि इतर अनुषांगीक बाबींचे नियोजन ग्रामपंचायतींना करण्याचे आदेश दिलेले आहेत.

 
Top