उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयाचे खरीप 2021 मधील पेरणी क्षेत्र 6 लाख 5 हजार हेक्टर होते. त्यापैकी सोयाबीन या पिकाचे क्षेत्र 3 लाख 84 हजार हेक्टर होते. म्हणजेच सोयाबीन हे आपल्या जिल्हयाचे खरिपातील मुख्य पीक आहे. पेरणीच्या 63% क्षेत्र हे सोयाबीन पिकाखालील आहे. सोयाबीनला मागील वर्षी मिळालेला चांगला भाव,आलेली उत्पादकता यामुळे चालु वर्षी सोयाबीनचे 3,94,000 हेक्टर क्षेत्र कृषि विभागाने प्रस्तावित केलेले आहे.

 सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असल्याने  पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या बियाण्यांपासून उत्पादीत होणारे सोयाबीन हे बियाणे  म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उगवण क्षमतेमध्ये काही अडचण येत नाही. साठवणूक केलेले सोयाबीन बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवणक्षमता तपासून व बिजप्रक्रिया करुन पेरणी केल्यास नक्कीच शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. बाजारात सद्या सोयाबीनचे वाढत असलेले दर विचारात घेता शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन विक्री करु शकतात मात्र सोयाबीन दराबाबत शेतक-यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता  येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याकडील राखून ठेवलेले बियाणे हे उगवणक्षमता तपासून व बिजप्रक्रिया करुन पेरणी करावी. विद्यापीठांनी संशोधित केलेले अनेक वाण जे एस 335 या वाणापेक्षा सरस असल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रामुख्याने MAUS 71, MAUS 162,MAUS 612, MAUS 158, DS 228, KDS 726, KDS 753 या वाणांचा उल्लेख करावा लागेल. यातील काही वाणांचे एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन शेतक-यांना मिळाले आहे, विशेषत: कोरडवाहू परस्थितीमध्ये MAUS 158 आणि DS 228 या वाणांची उत्पादकता चांगली दिसून आलेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी वर नमूद केलेल्या वाणांचे किंवा ज्या वाणांची उत्पादकता शेतक-यांना चांगली मिळाली आहे, त्या वाणांचे बियाणे राखून ठेवावे. यातील काही वाण जसे KDS 726 आणि KDS 753 हे कृषि सेवा केंद्रातून मोठया प्रमाणात मिळण्यासाठी 2-3 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांना पसंतीत उतरलेल्या या सारख्या वाणांसाठी घरचे बियाणे राखून ठेवणे हा या वाणाखालील क्षेत्र वाढविण्याचा एकमात्र पर्याय आहे. तसेच चालू वर्षी उन्हाळी हंगामामध्ये 2500 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. त्यामधून देखील सोयाबीन बियाणे खरीप हंगाम 2022 साठी वापर शेतक-यांना करता येणार आहे.

  येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी  कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली  पेरणीसाठी राखुन ठेवलेल्या बियाण्याची  उगवणक्षमता तपासावी व योग्य प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.

 
Top