मुरूम  (प्रतिनिधी) : 

उत्तर प्रदेश राज्यातील जंगमवाडी मठ (काशी) येथील जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापिठाकडून राज्याचे माजीमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा नुकताच काशी येथे समारंभपूर्वक मानाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 काशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात यांची सोय व्हावी म्हणून अनेकवेळा  पाटील परिवाराकडून सहकार्य झाले. या वेळी सौर उर्जा प्लँट बसवून देवून भाविकांची सोय करुन दिल्याबद्ल महाराजांनी बसवराज पाटील यांच्या परिवाराप्रती भावना व्यक्त केली.

या प्रसंगी जगद्गुरू विश्वाध्याय ज्ञान सिंहासन महापीठ काशीचे जगद्गुरु श्री. डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी काशी जगद्गुरु पिठाचे उत्तराधिकारी म्हणून सोलापूरच्या होटगी मठाचे महास्वामी श. ब्र. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी यांची निवड केली. यानिमित्त पासून काशीपीठ येथे देशातील विविध मठाचे मठाधिपती संत-महात्म्यांच्या उपस्थितीत नूतन जगद्गुरुंच्या पट्टाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या मठामध्ये नियमित ४२ दिवस विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात जगदगुरु श्री. डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते माजीमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांना गौरवपत्र, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी नूतन जगद्गुरु श्री. डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी, श्री. गंगाधर शिवाचार्य स्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रिय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, काशी पिठाचे ट्रस्टी तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, पुणे येथील उद्योजक बाबासाहेब कल्याणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्ल मुरूम शहर व परिसरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

 
Top