उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राबविलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवावेत, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी दीपक सिंघला यांनी केले.

उस्मानाबाद येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आगामी निवडणुकासंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी आज (दि.30) शहरातील परिमल मंगल कार्यालयात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश संयोजक रंगा (अण्णा) राचुरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे, सचिव अनिल ढवळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित खोत, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रदेश प्रभारी सिंघला यांनी, देशात नवी दिल्लीनंतर पंजाब आणि गोवा राज्यात आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशाचा उल्लेख करुन आता महाराष्ट्रातही आम आदमी पार्टी हा अन्य पक्षांना पर्याय म्हणून पुढे येईल असे सांगितले. तसेच महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरलेल्या आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील कावळेवाडी (ता.उस्मानाबाद) ग्रामपंचायतचा लोकाभिमुख कारभार आणि येथील शाळेचे कौतुक केले.

*तेरणा सुरु झाला असता तर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असता - अ‍ॅड. अजित खोत*

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित खोत म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. जर तेरणा कारखाना वेळेत सुरु झाला असता तर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु राजकारण्यांची कारखाना सुरु व्हावा अशी मानसिकताच नाही. त्यामुळे आता आम आदमी पार्टीकडे शेतकरी, जनता मोठ्या आशेने बघत आहेत. त्यामुळे कारखाना सुरु होईपर्यंत आम आदमी पार्टी स्वस्थ बसणार नाही. एसटी महामंडळ, वीज कामगारांचे प्रश्न सोडविण्यातही महाविकास आघाडी सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी हाच जनतेसमोर सक्षम व प्रभावी पर्याय आहे. म्हणून आता प्रत्येक कार्यकर्त्याने मीच केजरीवाल असे समजून काम करावे. येणार्‍या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

*पक्षाचा विचार घराघरात पोहचवा - सुग्रीव मुंडे*

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघितल्यावर अनेक प्रश्न अजून तसेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता भाषणाला नुसते टाळ्या वाजवून चालणार नाही. त्यासाठी पक्षाची विचारधारा अरविंद केजरीवाल यांचे परिवर्तनवादी विचार घराघरात पोहचविण्याचे आवाहन मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांनी केले.

*पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार - धनंजय शिंदे*

ज्या पुरोगामी महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविली. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार मांडल्याचे दुदर्र्ेवी चित्र आहे. आज अत्युच्च दर्जाचे शिक्षण सरकारी शाळांमधून देण्याचे काम अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार असलेल्या राज्यांमध्ये केले जाते. गोरगरीबांना सरकारी दवाखान्यांमधून मोफत चांगले उपचार मिळतात. पाणी, वीज अशा मूलभूत सोयीसुविधा देखील तेवढ्याच तत्परतेने मिळतात. मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी केला.

*संघटन अधिक मजबूत करा - राचुरे*

अध्यक्षीय भाषणात प्रदेश संयोजक रंगा (अण्णा) राचुरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर त्यांनी सडकून टिका केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

*भव्य रॅलीने दणाणले शहर*

आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी उस्मानाबाद शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. माणिक चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आनंदनगर मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जिजाऊ चौक, बार्शीनाका मार्गे परिमल मंगल कार्यालयात रॅली विसर्जित करण्यात आली. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचा जयघोष करुन परिसर दणाणून सोडला.

*कावळेवाडी ग्रामपंचायतच्या शिलेदारांचा सत्कार*

आम आदमी पार्टीचा झेंडा फडकवणार्‍या महाराष्ट्रातील पहिल्या कावळेवाडी (ता.उस्मानाबाद) ग्रामपंचायतने येथील जिल्हा परिषद शाळेत दिल्लीच्या धर्तीवर विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षणासह सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे ही शाळा राज्यात रोल मॉडेल ठरली आहे. तसेच गावातील रस्ते, वीज, स्वच्छता, पाणी व इतर मूलभूत प्रश्न सोडवून आदर्श निर्माण केला आहे. या ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.ज्योती अजित खोत व सर्व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यात सत्कार करण्यात आला. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. तर हार-तुर्‍यांऐवजी वापरायोग्य वस्तू म्हणजेच रुमालांचा संच असलेला गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे व माया जाधव यांनी केले. आभार प्रा. भाऊराव खिचडे यांनी मानले. 

कार्यक्रमास उस्मानाबाद युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, तालुका उपाध्यक्ष राजपाल देशमुख, शहराध्यक्ष बिलाल रजवी, सचिव नामदेव वाघमारे, तुळजापूर तालुकाध्यक्ष मधुकर शेळके, शहराध्यक्ष प्रशांत इंगळे,  तालुका उपाध्यक्ष साहेबलाल शेख, कळंब  तालुका उपाध्यक्ष प्रा.भाऊराव खिचडे तसेच अकीब पटेल, वसीम खान, प्रा.चाँदपाशा शेख,राहुल माकुडे, अतुल वाकुरे, परमेश्वर खडबडे, अ‍ॅड. रघु गोरे, प्रमोद डोंगरे, आकाश महाजन, उस्मान तांबोळी, महिला आघाडीच्या संध्या सोनटक्के आदी पदाधिकार्‍यांसह जिल्ह्यातील पुरुष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top