उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्ष लागवड आणि विविध सामाजिक संदेश देत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथून गाणगापूरकडे निघालेल्या सायकल यात्रेचे आज (दि.16) उस्मानाबाद येथे स्वागत करण्यात आले. उस्मानाबाद येथे आगमन झाल्यानंतर सायकल यात्रेत सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून जयघोष केला. झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा प्रदूषण टाळा अशा घोषणा त्यांनी दिल्या.

पिंपळगाव (ज) येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्फत दरवर्षी येवला - तुळजापूर- गाणगापूर या मार्गावरुन ही सायकल यात्रा काढण्यात येते. सायकल यात्रेचे यंदा 16 वे वर्ष आहे. पिंपळगाव (ज) येथून निघालेली ही यात्रा अहमदनगर जिल्ह्यात भूम, येरमाळा मार्गे आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद  शहरात दाखल झाली. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्‍या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींचा जयघोष करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या घोषणा त्यांनी दिल्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद शहरातून सायकल यात्रा तुळजापूरकडे मार्गस्थ झाली. तुळजापूर येथे यात्रेचा मुक्काम असून रविवार, 17 एप्रिल रोजी सकाळी अक्कलकोटकडे प्रयाण करणार आहे.

भाजपाच्या वतीने स्वागत

सायकल यात्रेचे उस्मानाबाद शहरात उस्मानाबाद जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी स्वागत केले. यात्रेतील तरुणांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.नितीन भोसले, समन्वयक अभय इंगळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, सचिन लोंढे, हिम्मत भोसले, विद्या माने आदी उपस्थित होते.

 
Top