उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटक राज्याचा मुलांचा संघ अव्वल ठरला आहे. तर मुलींमध्ये छत्तीसगड संघाने बाजी मारली.
महाराष्ट्र संत विद्यालयाच्या भव्य मैदानावर शुक्रवारी व शनिवारी दिवस-रात्र सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये छत्तीसगड, पाँडिचरी, तेलंगण, दिल्ली, हरियाणा, दादरा नगर हवेली, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ, झारखंड, गोवा, मध्य प्रदेश अशा १३ राज्यांतील २० संघ सहभागी झाले होते. मुलांच्या गटातून अंतिम फेरीत महाराष्ट्र व कर्नाटक संघाने धडक मारली. चुरशीच्या लढतीत कर्नाटक विजयी झाला. उपविजेता महाराष्ट्र ठरला. तृतीय स्थान पाँडेचरीने, चौथे छत्तीसगडने पटकावले. मुलींच्या संघामध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगड, दुसरे स्थान पाँडेचरी, तृतीय तेलंगण, चतुर्थ स्थान महाराष्ट्राने मिळवले. असोसिएशनचे सचिव अमोल कस्तुरे, उपाध्यक्ष प्रतीक नाईकवाडी, नरेश चंदेले, भूषण भक्ते, लक्ष्मण राऊत, मंगेश पांगरकर, भारत नाईकवाडी, नवनाथ इंगळे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले.