उमरगा / प्रतिनिधी-

तालुक्यातील गुंजोटी येथील युवकाच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीनही आरोपींना   न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात अाला अाहे.

गुंजोटी येथील इंग्रजी शाळेतील शिक्षक जावेद काझी यांचा १८ मार्च रोजी गावातील राणी नागोराव गंजेकर, नागोराव माणिक गंजेकर, राजेंद्र विठ्ठल दुधभाते, संदीप दुधभाते या सर्वांनी मिळून संगनमताने प्रेम प्रकरणातून खून केल्याची फिर्याद सिराज काझी यांनी १९ मार्च रोजी दिली होती. मयत जावेद याच्या डोक्यास बऱ्याच जखमा दिसत असून आरोपी राणी व नागोराव गंजेकर यांच्या घरी रात्री अकराच्या सुमारास मारहाणीतून त्याचा खून झाल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. सदरचा गुन्हा नोंद होताच पोलीसांनी राणी नागोराव गंजेकर, नागोराव माणिक गंजेकर, राजेंद्र विठ्ठल दुधभाते यांना अटक केली. सरकार पक्षातर्फे सदर जामीन अर्जास हरकत घेत आरोपींचा प्रस्तुत गुन्ह्यात सहभाग असून अजून गुन्ह्याचा तपास होवून दोषारोप दाखल झालेले नसताना आरोपींना जामीन दिल्यास ते फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने तसेच गुन्हा अतिशय गंभीर असल्याने आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याचे व पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

त्यावेळी आरोपीतर्फे अॅड.अक्षय तोतला यांनी आरोपींना चुकीच्या माहिती व संशयावरून सदर गुन्ह्यात गोवले आहे. गुन्ह्यात आरोपींविरूध्द थेट व सबळ पुरावा नसल्याने व प्रथम खबर विश्वासाहार्य नसल्याबाबत युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे व सकृतदर्शनी पुरावा लक्षात घेवून शुक्रवारी काही अटीवर आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.

 
Top