उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि.24) सायंकाळी आठच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरात कृत्रिम विजटंचाईच्या विरोधात कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. कडक उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राला भारनियमनाचे चटके देणार्‍या सरकारचा धिक्कार करण्यात आला.

उस्मानाबाद शहरात विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी सायंकाळी भाजपाचे कार्यकर्ते एकत्र जमले. त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यासह राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणार्‍या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. संपूर्ण भारनियमन मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असे यावेळी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सांगितले. यावेळी कंदील आंदोलनात माजी नगरसेवक व्यंकटेश कोरे, वैभव हंचाटे, राहुल काकडे, ओम नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, सुजित साळुंके, प्रवीण पाठक, गिरिष पानसरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, भूम, परंडा येथे तसेच मंडळ स्तरावर भाजपाच्या वतीने आंदोलन करून ठाकरे सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला.


 
Top