उस्मानाबाद (प्रतिनिधी) - 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती २०१९ नंतर म्हणजेच दोन वर्षांनी साजरी करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे भीम जयंती मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी भीम सैनिक व अनुयायांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. याचाच भाग म्हणून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१३ एप्रिल रोजी भीमजी ऑटो रिक्षा युनियन यांच्यावतीने शहरातून ॲटो रिक्षा रॅली काढण्यात आली.

 डॉ. मध्यवर्ती बस स्थानकातून या रॅलीचा शुभारंभ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा कार्यकारणी सदस्य भैय्यासाहेब नागटीळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भीमजी ऑटो रिक्षा युनियनचे मार्गदर्शक अरुण रणखांब, अध्यक्ष विलास सोनवणे, उपाध्यक्ष अमोल वाघमारे, सचिव धर्मा दुपारगुडे, कोषाध्यक्ष शितल धावारे, नंदू सोनवणे, सागर सिरसाटे, दत्ता शेवाळे, आकाश माळाळे, विजय गवळी, संतोष कांबळे, सुरेश सरवदे, सुनील रणदिवे, अभिजीत शिंगाडे, शंकर शिंगाडे आदीसह पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ही रॅली बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ताजमहल टॉकीज चौक, देशपांडे स्टॅन्ड, आझाद चौक, माऊली चौक, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस, त्रिसरण चौक, लेडीज क्लब मार्गे राजमाता जिजाऊ चौक (बार्शी नाका), माणिक चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मार्गे पोलिस मुख्यालय, आनंद नगर, समता नगर, महात्मा ज्योतिबा फुले चौकात आल्यानंतर फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. 

 

 या रॅलीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह निळ्या ध्वजांनी रिक्षाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरुषांचा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच या रॅलीचे ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले.

जिजाऊ चौकात रॅलीचे स्वागत रवी झोंबाडे, चंद्रकांत पांढरे, विशाल भोसले, रमेश यादव, राजकुमार ढैबळे, आबा नाईकवाडी, संतोष तनमोर, लक्ष्मण हुंबे आदींनी पुष्पहार घालून व फटाक्यांची आतषबाजी करीत केले. तर आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादनाने रॅलीची सांगता करण्यात आली. तसेच रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आनंद नगर पोलिस ठाण्याचे बालाजी काटकर,  राठोड सचिन खंडेराव, ज्ञानेश्वर कागदे, नागेश लोमटे आदीसह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 
Top