मुरुम (प्रतिनिधी) : 

कारखान्यांनी केवळ साखर उत्पादन आणि उपपदार्थांवर अवलंबून न राहता, यापुढच्या काळात सीएनजीसारखे बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अशा नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रकल्पांमध्ये प्रतिदिन २५०० किलो सीएनजी गॅस ११ मेटन सेंद्रीय खत व लिक्वीड फर्टीलायझर उत्पादीत करण्यात येणार असून त्यामुळे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस वापराचे प्रमाण कमी होऊन परिसरातील जनतेचा आर्थिक फायदा होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पामध्ये उत्पादीत झालेला सेंद्रिय खत कारखाना परिसरातील शेतकऱ्यांना स्वस्त दराने विक्री करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च ३० कोटी इतका असणार आहे. तयार झालेला सीएनजी गॅस आपले ऊस वाहतूक करणारे ट्रक-ट्रॅक्टर यांना रुपये ४८ प्रति किलो दराने पुरवठा केल्यामुळे डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचे मत बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.

 मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना परिसरात विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व बागलकोट येथील प्रकृती रिनिवेबल एनर्जीजच्या संयुक्त विद्यमाने प्रेसमडवर आधारीत बायो-सीएनजी प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभ प्रसंगी गुरुवार (ता. ७) रोजी अध्यक्षस्थानावरुन उद्धाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, बिदरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कुशाल पाटील, सांगलीचे नामदेव बिरदे, शरद पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, संचालक शरणाप्पा पत्रिके, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, किल्लारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव पाटील, शिवमूर्ती भांडेकर गुरुजी,  केशव पवार, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, अँड. व्ही. एस. आळंगे, शिवलिंग माळी, प्राचार्य डॉ. दिलीप गरड, जिल्हा परिषदेचे सदस्य रफिक तांबोळी, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.                              

 यावेळी  कुशाल पाटील, शरद पाटील, नामदेव बिरदे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु पाटील तर आभार संचालक विठ्ठल बदोले यांनी मानले. या वेळी कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top