उमरगा / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊस तुलनेने जास्त क्षेत्रावर आजही उभा आहे. सर्व साखर कारखान्याने त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप करीत आहेत. असे असलेतरी उमरगा-लोहारा तालुक्यासह बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील संपूर्ण ऊस ३१ मे पूर्वी संपविण्याचा साखर आयुक्तालयाचा प्रयत्न असणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

तालुक्यात शेतकऱ्यांचे ऊसाचे फड गाळपाअभावी आता चिपाड होत आहेत. उमरगा-लोहारा तालुक्यात ऊसाचे क्षेत्र १२ हजार ५०० हेक्टर असून आतापर्यंत ११ हजार ८५० क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले आहे. अद्यापही साडेसहाशे हेक्टरवरील ऊस शिल्लक असून गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस गेल्या डिसेंबर महिन्यात गाळपासाठी कारखान्याला जाणे अपेक्षित होते.परंतु एप्रिल सुरू झाला तरी ऊस कारखान्याला गेला नाही. गाळपाचा कार्यक्रमही अद्याप जाहीर केलेला नाही. ऊस शेतात पडून राहिल्यामुळे उसाचे चिपाड होत आहे. उसाचे गाळप उशिरा झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सरकारने शेतकऱ्यांना साखर उताऱ्यातील घट अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तालुक्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याने तोडणीचा प्रोग्राम लांबत चालला आहे. तेरा-चौदा महिन्याला ऊस गाळपास तुटत असल्याने कारखान्याला साखर उतारा चांगला मिळाल्यामुळे फायदा होत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ऊसाला फुलकळी होण्यास अनुकूल हवामान असल्याने बहुतेक ऊस जातींना तुरा जास्तीत जास्त प्रमाणात येत आहे. तुरा येऊन एक-दोन महिन्याचा काळ लोटला तर मोळी बांधण्यास वाढे शिल्लक रहात नसल्याने मोळी बांधण्यासाठी सुतळीचा वापर करावा लागतो आहे. सद्या कडक उन्हाळ्याचे दिवशी असल्यामुळे ट्रक, ट्रॅक्टरचे मजुरही ऊस तोडण्यास तयार होत नाहीत. तुरा आल्यानंतर जसा उशीर होईल तसा ऊस आतुन पोगर होत असल्याने व ऊस तोडण्यासाठी मजूर टाळाटाळ करत आहेत.

 तुरा आलेला ऊस शेतामध्ये दिड ते दोन महिन्यांच्या पुढे राहिला तर ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोज याने विघटित साखरेत रूपांतर होत असल्यामुळे साखरेचा उतारा कमी होतो आहे. परिणामी शेतकऱ्यासह कारखान्याचे नुकसान होते. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करणे गरजेचे आहे. सद्या क्षमतेपेक्षा अधिक उस गाळप झाल्याने येत्या काही दिवसात कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी स्वतः तोड व वाहतूक करून कारखान्यात उस घेवून येण्याचे आवाहन केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शिवाय गाळपाअभावी ऊस फडात राहण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.

 उमरगा-लोहारा तालुक्यात तीन साखर कारखाने असून एकूण १२हजार ५००हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत ११ हजार  ८५० हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप झाले तर साडेसहाशे हेक्टर क्षेत्रातील ऊस अद्यापही फडात उभा आहे. ऊसाची तोड होत नसून सद्या भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा हंगाम १५ एप्रिलला संपत असून विठ्ठल-साई कारखाना हा मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असलीतरी शिल्लक उसाचे गाळप न झाल्यास शेतकरी अडचणीत येणार आहेत.


 
Top