उमरगा / प्रतिनिधी-

गेल्या काही दिवसापासून शहरासह तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली असून सकाळी नऊ ते साडेनऊ पासून चैत्र मासात वैशाखाची अनुभूती यायला लागली आहे. उन्हाचा चढता पारा वृध्द व बालकांच्या आरोग्यासाठी घातक होत चालला असून दुपारच्या वेळात शहरात सर्वत्र निरव शांतता पहावयास मिळत आहे.

तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल मार्चच्या मध्याय पासूनच लागली असून आता एप्रिल महिना सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की सकाळी अकराच्यानंतर घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. शहरात बाजारपेठ, मुख्य ठिकाणी दुपारपासून ते सायंकाळी पाचपर्यंत सर्वत्रच शुकशुकाट दिसून येतो आहे.ग्रामीण भागात नागरिक पहाटे चार वाजता शेतीतील कामे आटोपून उन्हाच्या अगोदर घर गाठत आहेत. दुपारच्या वेळात जनावरे झाडाच्या सावलीत चारापाणी करुन शेतकरी विसावा घेत आहेत. उन्हापासुन बचाव करण्यासाठी नागरिक सुती कपडे, गॉगल्स, रुमाल व टोप्या आदी साहित्याचा वापर करत आहेत. युवती, महिलां स्कार्पचा वापर करुन उन्हाच्या तीव्रतेतुन सुटका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहरातील हॉटेल्स अन रस्त्याकडेला थाटलेल्या थंड पेयाच्या दुकानावर शीतलता मिळण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. काही जण लिंबु पाण्याबरोबरच कलिंगड फळालाहि पसंदी देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

     

 
Top