उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भूम येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दुर्गम भागातील नागरिकांसाठी दि. 22 ते 25 मार्च 2022 दरम्यान भूम,परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यातील वैद्यकीय व दंत शल्यचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 2647 इतक्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरमार्फत तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आला, तर शिबिरात निदान झालेल्या 244 रुग्णावर दि.24 ते 31 मार्च 2022 दरम्यान मोफत शस्त्रक्रिया करून औषध उपचार करण्यात आले. यासाठी भूम,परंडा, वाशी,कळंब आणि जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील शस्त्रक्रिया गृहामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या.      

 जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, श्रीमती वैशालीताई मोटे, रुग्णकल्याण समितीचे चेतन बोराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन बोडके, डॉ. आर.व्ही.गलांडे, डॉ. नानासाहेब गोसावी, डॉ.एम.आर पांचाळ, वैद्यकीय अधीक्षिका डॉ.कांता सूळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे आदी उपस्थित होते.

  या शिबिरात 99 रुग्णांवर दंत शस्त्रक्रिया  , हर्निया 17 , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया,  टंग टाय 07, मोतीबिंदू 80 आणि इतर 07   अशा एकूण 244 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरासाठी बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.  या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय कळंब, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि ग्रामीण रुग्णालय भूम या ठिकाणी पार पडल्या. ग्रामीण तसेच दुर्गम  भागातील जनतेसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top