उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य मंत्रीमंडळामध्ये उस्मानाबाद जिल्हयाचे तीन जावई आहेत. चार पैकी तीन आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. तरी देखील उस्मानाबाद जिल्हा दुर्लक्षीत असल्याची खंत अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान बोलतांना आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी विधान सभेत व्यक्त केली.

 सोलापुर-तुळजापुर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने एक रुपयाचीही तरतुद केलेली नाही. केंद्र सरकारने रु.३२ कोटी दिले आहेत. राज्य सरकारने देखील समप्रमाणातील वाटा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. राज्यातील १८ जिल्हयात नविन महिला रुग्णालय व नवजात शिशु रुग्णालयाची घोषणा झाली. काही रुग्णालयाच्या श्रेणीवर्धणाची घोषणा झाली. परंतू यात उस्मानाबादचा उल्लेख नाही. उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयाची क्षमता ६० खाटांची असुन १५० हुन अधिक रुग्ण उपचार घेत असतात. रुग्णांवर जमिनीवर गादी टाकुन उपचार केले जातात, त्यामुळे २०० खाटांच्या रुग्णालयाला मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा.

 कौडगाव एम.आय.डी.सी. मध्ये १५०० एकर जमीन उपलब्ध आहे. दोन वर्षे होऊन देखील तेथील सौर उर्जा प्रकल्प अर्धवट आहे. उद्योग खात्यांचे मंत्री उस्मानाबादला कधी आले नाहीत. वारंवार मागणी करुन देखील बैठक घेतली जात नाही. केंद्र सरकार येथे टेक्नीकल टेक्सटाईल पार्क उभारण्यास तयार आहे, मात्र राज्याकडुन प्रस्तावच जात नाही. वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील केवळ रु.९.४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी जास्तीचे पैसे उपलब्ध व्हावेत, बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रमाणेच सुसज्ज महाविद्यालय उभारण्याची मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान केली.

 शेतकऱ्यांच्या जिव्हाळयाच्या पिक विमा विषयावर बोलतांना आ.पाटील यांनी राज्‍य तक्रार निवारण समितीने आजवर बैठकच घेतली नसल्याचे विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणुन दिले. कृषी मंत्रयांनी हा विषय समजुन घेतला असता तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता. बैठकच झाली नाही त्यामुळे हा विषय समजुन घेण्याची विनंती केली. संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका समाधी स्थळ येथील विकास कांमासाठी अपुरा निधी प्राप्त होत असुन श्रीसंत जगनाडे महाराज समाधी स्थळ विकासासाठी केलेल्या रु.१० कोटीच्या तरतूदी प्रमाणे तेर येथील ‍विकास कामांसाठी देखील अर्थ संकल्पामध्ये निधीची तरतुद करण्याची मागणी केली.

 
Top