उस्मानाबाद(प्रतिनिधी)

तालुक्यातील नितळी येथील जयलक्ष्मी शुगर, शीला अतुल शुगर या साखर कारखान्याकडील तीन वर्षाच्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. वारंवार  निवेदने देऊनही शेतकर्‍यांना अद्याप ऊसबिलाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी आज (दि.23) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन सुरू करुन मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

 याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद, उमरगा, औसा, निलंगा, बार्शी, देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सन 2014-15 व 2018-19 व 2019-20 या साली  नितळी येथील जयलक्ष्मी शुगर या साखर कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. अद्याप आमचे ऊसाचे बिल मिळालेले नाही. याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले असताना कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे 23 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकर्‍यांनी दिलेला होता. तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.


 
Top