उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतुन शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहीरीसाठी निधी वाढवुन मिळावी अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह आमदार कैलास घाडगे पाटील यांनी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली आहे. वाढलेल्या महागाईचा विचार करुन ही वाढ होणे अपेक्षित असुन सध्याच्या स्थितीला मिळणारा निधी हा अत्यल्प असल्याचे आमदार घाडगे पाटील यानी म्हटले आहे. 

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होण्यासाठी सिंचन विहीरीचा लाभ देण्यात येतो.जिल्ह्याचा विचार करता सिंचनासाठी अशा साधनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या योजनाकडे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने पाहतो,मोठ्या संख्येने योजना राबविण्यासाठी शेतकरी पुढाकार घेताना दिसत आहेत. सध्या लाभार्थ्याला या विहीरीसाठी तीन लाख रुपयाचा निधी दिला जातो.वाढती महागाई,मजुरी यामुळे विहीरीचे काम पुर्ण करण्यास लाभधारकांना मोठ्या अडचणीचा सामना येत आहे, साहजिकच येत असलेल्या अडचणीचा विचार करुन शेतकरी या योजनेपासुन वंचित राहत असल्याचेही चित्र निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना परवडेल व त्याना अधिक अडचणी येणार नाहीत यासाठी या योजनेमध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. काळानुरुप यामध्ये बदल झालेला नाही,शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहु नये यासाठी निधी वाढवुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातुन वारंवार होत आहे.त्याचा विचार करुनच रोजगार हमी योजना विभागाकडुन त्याची दखल घेऊन शेतकऱ्यांची ही रास्त मागणी पुर्ण करावी अशी अपेक्षा आमदार घाडगे पाटील यानी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.रोजगार हमी योजनेतुन सिंचन विहीरीसाठी निधी वाढवुन देण्याबाबत योग्य तो निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती आमदार घाडगे पाटील यानी श्री. भुमरे यांची भेट घेऊन केली आहे.यावेळी आमदार संतोष बांगर, संजय रायमुलकर, नितीन देशमुख, योगेश कदम आदीची उपस्थिती होती.

 
Top