उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

शेतीच्या विकासासाठी माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे.त्याचप्रमाणे गावच्या विकासासाठी गाव कारभारी सक्षम असायला हवा असे मत परिवर्तनवादी,विचारांचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दोन मार्चला आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ.प्रशांत पवार

शिंगोली चे सरपंच येडबा शितोळे, गणपत मगर, ग्रामसेवक विजयसिंह नलावडे, हरिश्चंद्र शिंदे, दीपक पाटील, रमेश पडवळ,पपीन भोसले, गणेश येडके,प्रसाद मुंडे, प्रसाद राजमाने, शेषेराव पाटील,संजय शिंदे,संतोष मगर, दादा शिंदे,शिवाजी शिंदे ,सचिन शिंदे,धनंजय समाधान शितोळे,मनोज  शिंदे आदींची उपस्थिती होती.

 आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भास्करराव पेरे-पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले,आपले पूर्वज शंभर वर्षाच्या पुढे आयुष्य जगले.. आज मात्र साठ वर्षाच्या पुढील जिवंत राहण्याची क्षमता कमीच आहे.यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यायची गरज आहे. गावचा कारभारी सरपंच सक्षम असायला पाहिजे. सरपंचाने आईची भूमिका पार पाडली तरच गावचा विकास होतो. शिक्षणाचा फायदा शेतीला झाला पाहिजे,युवा पिढीने आधुनिक पद्धतीन शेती केली पाहिजे. त्यासाठी शेतीचे माती परीक्षण महत्त्वाचा आहे. संत तुकाराम महाराज, एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेली शिकवण आपण पुढे नेतोय.

         भास्करराव पेरे पाटलांनी पाटोदा गावचा झालेला कायापालट सांगताना म्हणाले, आजपर्यंत गावाला आपण चार प्रकारचे पाणी उपलब्ध करून दिलं. आता या महिन्याभरात पाचव्या प्रकारचं अत्यंत शुद्ध आणि शंभर रुपये लिटर असणार पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणार आहे.याची सर्व टेंडर प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे.   बेवारस असणाऱ्या ३८ व्यक्तींच्या उपजीविकेची जबाबदारी माझ्या ग्रामपंचायतीने घेतलेली आहे. त्यामुळे गावस्तरावरचे सर्व निर्णय घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या सरपंचाला सर्वांच्या पाठबळाची गरज आहे. गावागावात दुचाकीच्या मागं धावणाऱ्या कुत्र्यागत काही मोकाट उपद्रवी असतात.याकडे दुर्लक्ष करणं केव्हाही चांगलं असा उपदेशही भास्करराव पेरे पाटील यांनी गाव गाडा हाकणाऱ्या सरपंचांना दिला. या कार्यक्रमाला शिंगोली आणि परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top