उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बँक कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाच्या विरोधात संप पुकारलेला असून नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनासह स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या अन्य मागण्याही त्यांनी केले आहेत . वारंवार संप पुकारून ग्राहकांची गैरसोय करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.

 बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस मार्च अखेर संप पुकारल्यामुळे सर्व ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बँकेच्या खाजगीकरणाचे कारण पुढे करून स्वतःच्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी वारंवार संप पुकारून सर्व ग्राहकांची गैरसोय बँक कर्मचारी, अधिकारी करत आहे. बँकेत ठेवी ठेवणाऱ्या ग्राहकांना तसेच अन्य कारणासाठी बँकेचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँक कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते. बँक कर्मचाऱ्यांना असे वाटते की बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आपल्या खिशातले पैसे आपण देतो की काय? असा भास नेहमीच त्यांना होतो. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगारी असल्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात उर्मटपणा असल्याचे स्पष्टपणे दिसते. सर्व बँक कर्मचारी व अधिकारी हे विसरतात की आपण ग्राहकांचे सेवक आहोत. सरकारी बँकेत ग्राहकांचे व्यवस्थित काम होत नसेल तर बँकांचे खाजगीकरण करू नये असा अट्टाहास बँकेतील कर्मचारी व अधिकारी का करत आहेत ? बँकेत येणार्‍या ग्राहकांना उर्मटपणा अरेरावीची अशा प्रकारची भाषा वापरत असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे .सरकारी बँकेत मात्र आमचे काय वाकडे करू शकत नाही असेच बँक कर्मचारी व अधिकारी यांची धारणा झालेली आहे. त्यामुळे  कामचुकारपणा व स्वतःच्या स्वार्थासाठी संप पुकारणाऱ्या बँक कर्मचारी व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ॲड भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

 
Top