उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय विधा सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मंुबई यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्हयामध्ये १२ मार्च रोजी आयोजीत केलेली राष्ट्रीय लोकअदालत वैशिष्टयपुर्ण ठरली आहे. या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण के.आर.पेठकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. 

राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एम.आर.नेरलेकर, व्ही.जी.मोहिते जिल्हा न्यायाधिश, विशेष न्यायाधिश एस.डी. जगताप, जिल्हा न्यायाधिश-१ पी.एच.करवे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सस्ते, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधिश मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक नवनीत कावत, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली डंबे-आवले, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष िनतीन भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव सर्व न्यायीक अधिकारी, भूसंपादन विमा कंपन्या, बँक अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिनानिमित्त महिला असलेले एक पॅनल तयार करण्यात आले. सह दिवाणी न्यायाधिश श्रीमती एस.एस माने यांनी काम पाहिले. बऱ्याच दिवसापासून रखडलेले दोन वैवाहीक प्रकरणे मिटविण्यात आली. तर एका वृध्द महिलेच्या प्रकरणामध्ये महिलेची ओळख पटवून प्रकरणात तडजोड करण्यासाठी जिल्हा न्यायाधिश व्ही.जी.मोहिते स्वत: वृध्द महिलेच्या गाडीपर्यंत गेले. मोटार अपघातामध्ये मयत झालेल्या संभाजी खाडे याच्या वारस पत्नीस व त्यांच्या परिवारास तडजोड करून ७० लाख रुपयांचा धनादेश तात्काळ देण्यात आला. जिल्हयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढया मोठ्या रक्कमेची तडजोड होऊन तत्काळ धनादेश देण्याची घटना घडली. 

१९ कोटी ५७ लाख १२ हजार ७६८ रुपयांची तडजोड

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १७२४ प्रलंबित प्रकरणे तर दावा पुर्व एकुण ४४९ प्रकरणे तडजोडी अंती निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये दिवाणी स्वरूपाचे १०१४, मोटारअपघात/कामगार नुकसान भरपाई ७३, भूसंपादन प्रलंबित प्रकरणे ३६, फौजदारी तडजोड पात्र स्वरूपाचे प्रकरणे ८१, वैवाहीक संबंधीची प्रकरणे ३८, धनादेश प्रकरणे १८४, वीज देयक प्रकरणे १८, बँक प्रकरणे १३१, नगर पालिका व ग्रामपंचायत प्रकरणे १८५, ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे १७ आदी प्रकरणे समोपचाराने मिटविण्यात आले. तर २८१ प्रकरणामध्ये आरोपींनी गुन्हयांची कबुली दिल्यामुळे ५६ लाख ८६ हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाईची तडजोड करण्यात आली. या लोकअदालतमध्ये असे एकुण १९ कोटी ५७ लाख १२ हजार ७६८ रुपयांची तडजोड झाली. 

 
Top